वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
व्हाइट हाउसमधून बाहेर पडल्यावर पहिल्यांदाच लोकांसमोर प्रकट झालेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024 मध्ये पुन्हा एकदा अध्यक्षीय निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. रिपब्लिकन पार्टीतून बाहेर पडण्याचा माझा विचार नाही तसेच नवा पक्षही स्थापन करणार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी ज्या अतुलनीय प्रवासाला आम्ही एकत्रितपणे सुरूवात केली होती, त्याची अखेर अद्याप दूर आहे. अजून बरेच काही करणे शिल्लक आहे. आम्ही येथे आमचा पक्ष आणि देशाच्या भविष्यासंबंधी बोलण्यासाठी एकत्र आलो आहोत असे उद्गार ट्रम्प यांनी फ्लोरिडाच्या ऑरलँडमध्ये आयोजित कॉन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल ऍक्शन कॉन्फरन्सला संबोधित करताना काढले आहेत.
डेमोक्रेट्स निवडणूक हरले होते, डेमोक्रेटिक पार्टीला तिसऱयांदा पराभूत करण्याचा निर्णय मी घेऊ शकतो असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अध्यक्षीय निवडणुकीत स्वतःचाच विजय झाल्याचा दावा केला आहे.
बायडेन लक्ष्य
परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर निशाणा साधला आहे. आधुनिक इतिहासात कुठल्याही अध्यक्षाच्या कार्यकाळाचा पहिला महिना इतका खराब राहिलेला नाही. रोजगारविरोधी, कुटुंबविरोधी, सीमाविरोधी, ऊर्जाविरोधी, महिलाविरोधी आणि विज्ञानविरोधी असल्याचे बायडेन प्रशासनाने सिद्ध केले आहे. एका महिन्यातच ‘अमेरिका फर्स्ट’वरून ‘अमेरिका लास्ट’वर आणल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.









