वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
नवे वर्ष हे जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने गेल्या वर्षापेक्षाही कठीण असेल, असे प्रतिपादन जागतिक नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टालिना जॉर्गिएव्हा यांनी केले आहे. या वर्षात मंदीचे मळभ अधिक दाट होईल. जगाच्या अर्थव्यवस्थेपैकी एक तृतियांश अर्थव्यवस्था मंदीच्या झाकोळात असेल असा इशारा त्यांनी दिला.
अमेरिका, युरोपियन महासंघ आणि चीन या तीन्ही सर्वाधिक मोठय़ा अर्थव्यवस्था एकाच वेळी मंदावल्या आहेत. त्यामुळे याचा जगातिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार हे निश्चित आहे. ज्या देशांमध्ये मंदी नाही, त्या देशांमधील कोटय़वधी लोकांनाही मंदीचा अनुभव येईल, असे भाकितही त्यांनी वर्तवले आहे.
या मंदीचा लाभही घेता येणे शक्य आहे. जगाला पर्यावरणाचा विचार करण्याची संधी यामुळे मिळणार आहे. भविष्याकाळातील विकास आणि पर्यावरणस्नेही अर्थव्यवस्था यांच्यासाठी आवश्यक वातावरण या मंदीच्या काळात निर्माण करता येईल. यासाठी जगाने एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जागतिक नाणेनिधी संस्था यासाठी शक्य तितके सर्व प्रयत्न करणार आहे. अर्थव्यवस्थेचे स्वरुप काळानुसार आणि पर्यावरणाचे संवर्धन लक्षात घेऊन परिवर्तित करण्याचे काम या वर्षात करता येईल, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.









