सीडीएस जनरल बिपिन रावत यांची घोषणा : जम्मू-काश्मीरसाठी थिएटर कमांडची होणार स्थापना : साधनसामग्रीचा प्रभावी वापर शक्य
वृत्तसंस्था / .नवी दिल्ली
शेजारी देशांकडून निर्माण होणारा संभाव्य धोका पाहता भारतीय सैन्य तंत्रज्ञानात बदल करत स्वतःचे बळ वाढवू पाहत आहे. भारताच्या तिन्ही संरक्षण दलांमधील समन्वयाकरता केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) पद निर्माण केले आहे. सशस्त्र दलांना अधिक बलशाली करण्याच्या हेतूने थिएटर कमांडची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी सोमवारी केली आहे. या थिएटर कमांडची स्थापना 2022 पर्यंत होणार आहे.
चीन आणि अमेरिकेने यापूर्वीच धोके आणि आव्हानांचा विचार करत सैन्य थिएटर कमांडची निर्मिती केली आहे. भारताची भौगोलिक स्थिती वेगळी असल्याने अमेरिका आणि चीनच्या प्रारुपाऐवजी नवे अध्ययन करून थिएटर कमांड स्थापन केले जाणार आहे. दीर्घकाळापासून यासंबंधी चर्चा होत असली तरीही 2022 पर्यंत थिएटर कमांड अस्तित्वात येणार आहे. भौगोलिक स्थिती तसेच आव्हानांचा विचार करत विविध थिएटर कमांड स्थापन करण्यात येणार आहेत. गरजेनुरुप भारतात 2 ते 5 कमांड निर्माण केले जाऊ शकतात, असे रावत म्हणाले.
जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र कमांड
जम्मू-काश्मीरसाठी एक स्वतंत्र कमांड स्थापन केली जाणार असून याकरता लवकरच अध्ययन सुरू होणार आहे. या कमांडमध्ये जम्मू-काश्मीरची आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेचा पूर्ण हिस्सा असेल. सद्यकाळात जम्मू-काश्मीर सैन्याच्या उत्तर आणि पश्चिम कमांडच्या अंतर्गत येते.
नौदलासाठी कमांड
नौदलाच्या पश्चिम आणि पूर्व कमांडला एकत्र करून पेनिसुलर कमांड निर्माण केला जाईल. या कमांडसाठीचे अध्ययन 3-4 महिन्यांत पूर्ण होणार आहे. पेनिसुलर कमांड चालू वर्षाच्या अखेरपर्यंत अस्तित्वात येणार आहे. या कमांडचे नेतृत्व नौदलाचा अधिकारी करणार आहे. तसेच नौदलप्रमुखांच्या जबाबदारीत याकरता वाढ करणार आहे. वाढत चाललेली आंतरराष्ट्रीय आव्हाने आणि सागरी क्षेत्रात मोडणाऱया देशांसोबत उत्तम समन्वयावर नौदलप्रमुख लक्ष केंद्रीत करणार आहे.
वाहतूक यंत्रणेचा वापर
तिन्ही संरक्षण दलांना एक लॉजिस्टिक कमांड अंतर्गत आणले जाणार आहे. या निर्णयामुळे तिन्ही संरक्षण दलांना परस्परांच्या वाहतूक यंत्रणेचा गरजेवेळी वापर करता येणार आहे. या कमांडमुळे वेळेची बचत होण्यासह साधनसामग्रीचा वापर पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी होणार आहे.
एअर डिफेन्स कमांड
वायुदलाच्या अंतर्गत एअर डिफेन्स कमांड असणार आहे. या कमांडच्या अंतर्गत सैन्य, वायुदल आणि नौदलाच्या सर्व हवाई सुरक्षा यंत्रणांचा अंतर्भाव होणार आहे. तर प्रशिक्षणासाठी एक स्वतंत्र कमांड स्थापन करण्यात येणार आहे. यात तिन्ही संरक्षण दलांचे सैनिक एकत्रितपणे प्रशिक्षण घेणार आहेत. तिन्ही दलांसोबत काम करण्याच्या स्थितीत परस्परांसंबंधी अधिक माहिती असावी, हा यामागचा उद्देश आहे. उदाहरणार्थ ड्रोन आणि हेलिकॉप्टरचा तिन्ही संरक्षण दलांकडून वापर केला जातो.









