बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत शिक्कामोर्तब, ऑलिम्पिकमध्ये टी-20 क्रिकेट समावेशाच्या प्रस्तावाला पाठिंबा
वृत्तसंस्था / अहमदाबाद
2022 पासून आयपीएल स्पर्धेत 10 संघांचा समावेश असेल, यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी शिक्कामोर्तब केला. याशिवाय, 2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी आयसीसीच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा निर्णयही यात घेतला गेला. 2022 आयपीएल हंगामापासून 2 नवे संघ स्पर्धेत समाविष्ट होतील, असे मंडळातील सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
वास्तविक, पुढील हंगामापासूनच आयपीएलमध्ये नवे संघ समाविष्ट करण्याचा मंडळाचा विचार होता. पण, अगदी नववा संघ समाविष्ट करणे देखील कठीण असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर ही संकल्पना 2022 मध्ये प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. संघ वाढल्यानंतर सामने वाढतील, तसेच सर्व विदेशी खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडर पाहून स्पर्धेची रुपरेषा आखावी लागेल, या बाबींना वेळ लागणार असल्याने 2022 ची निवड केली गेली आहे.
ऑलिम्पिकमध्ये टी-20
बीसीसीआयने यावेळी 2028 लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा, यासाठी आयसीसीच्या प्रस्तावाला पूर्ण पाठबळ देण्याचा निर्णय संमत केला. सध्या या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून काही स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.
‘बीसीसीआय ही स्वायत्त संस्था आहे आणि ही स्वायत्तता कायम राखणे हा या संस्थेचा प्राधान्यक्रम आहे. या रचनेला काही धक्का बसणार नसेल तर आमचा प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा असेल. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणे हा सन्मान असेल आणि यादृष्टीने योग्य दिशेने वाटचाल होईल, असा विश्वास वाटतो’, असे मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला हजर राहिलेल्या एका सदस्याने नमूद केले. अर्थात, बीसीसीआयने आपल्याला नेमक्या कोणत्या बाबींना हरकत असेल, हे यावेळी स्पष्ट केले नाही.
स्थानिक युवा खेळाडूंना आर्थिक साहाय्य
पुरुष व महिला गटातील सर्व प्रथमश्रेणी खेळाडूंना हंगाम न झाल्याने ज्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले, त्याची काही प्रमाणात भरपाई करुन दिली जाईल, असा निर्णय या बैठकीत पुढे संमत करण्यात आला. प्रदीर्घ कालावधीनंतर जानेवारीत आयोजित सय्यद मुश्ताक अली टी-20 चॅम्पियनशिप स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमश्रेणी हंगामाला नव्याने सुरुवात होईल.
आयपीएलदरम्यान कनिष्ठ व वरिष्ठ महिला स्पर्धा
आयपीएल-14 दरम्यान महिलांच्या कनिष्ठ व वरिष्ठ गटात स्पर्धा होतील आणि त्याचप्रमाणे विविध वयोगटातील (यू-23, यू-19, यू-16) स्पर्धाही आयोजित केल्या जातील, असा निर्णय यावेळी कार्यकारिणीने घेतला. एकंदरीत स्थिती पाहता, पुढील आयपीएल भारतातच होईल, असे सध्याचे संकेत आहेत.
महिलांचे कसोटी सामने व्हावेत का, यावर या बैठकीत बरीच चर्चा झाली. पुढील वर्षी दोन कसोटी सामन्यांची छोटेखानी मालिका घेता येईल का, यावरही ऊहापोह झाला. मात्र, अंतिमतः निर्णय नंतरच होऊ शकेल, हे स्पष्ट झाले.
केव्हीपी रावना डच्चू
बीसीसीआयने गेम डेव्हलपमेंट जीएम केव्हीपी राव यांना यावेळी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला. राव यांनी यानंतर सर्व राज्य संघटनांना लेखी पत्र पाठवत हा आपला सर्वात आनंदी दिवस असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. माजी बिहार कर्णधार राहिलेले राव प्रदीर्घ कालावधीपासून बीसीसीआयमध्ये कार्यरत होते. बीसीसीआयशी संलग्न स्कोअरर व पंच यापुढे 55 वर्षाऐवजी 60 व्या वर्षी निवृत्त होतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
करसवलत न मिळाल्यास बीसीसीआयचे
123 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान?
भारत सरकारने पुढील वर्षी होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा भरवण्यासाठी आयसीसीने मागितलेली करसवलत मंजूर केली नाही तर बीसीसीआय आपल्या वार्षिक उत्पन्नातून काही वाटा कापून घेण्यास संमती देईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मंडळाचे आयसीसीकडून मिळणारे वार्षिक उत्पन्न 390 दशलक्ष डॉलर्स इतके आहे.
तूर्तास, करसवलत मिळावी, यासाठी आम्ही केंद्र सरकारशी संपर्क साधणार आहोत. पण, जर अशी करसवलत मिळाली नाही तर 123 दशलक्ष डॉलर्स इतक्या रकमेची आम्ही स्वतः भरपाई करु आणि ते एका अर्थाने आमचे नुकसानच असेल. अर्थात, आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा भारतच भरवेल, अशी आम्ही येथे ग्वाही देऊ इच्छितो, असे मंडळातील एका वरिष्ठ सूत्राने नमूद केले.
राजीव शुक्ला मंडळाचे नवे उपाध्यक्ष
ज्येष्ठ काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांची मंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली तर ब्रिजेश पटेल यापुढेही आयपीएल अध्यक्ष म्हणून कार्यरत असतील, असे निर्णय बीसीसीआय कार्यकारिणी बैठकीत एकमताने घेण्यात आले. आयसीसीमध्ये सौरभ गांगुली बीसीसीआयचे प्रतिनिधी असतील, तसेच सचिव जय शाह पर्यायी संचालक असतील, हे देखील यावेळी निश्चित केले गेले.
गांगुलीच्या स्वारस्य हित मुद्याविषयी
चर्चा नाही
बीसीसीआय अध्यक्ष माय इलेव्हन सर्कल फॅन्टसी गेमिंग ऍपची जाहिरात करत असल्याने याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल, असे संकेत होते. ड्रीम 11 या आयपीएल मुख्य पुरस्कर्त्यांची माय 11 ही थेट प्रतिस्पर्धी कंपनी आहे. त्यामुळे, गांगुली यांच्या जाहिरातीला विशेष विरोध होता. मात्र, आज संपन्न झालेल्या प्रत्यक्ष बैठकीत याविषयी अगदी एकही प्रश्न विचारला गेला नाही.









