नवी दिल्ली
भारतामधील भविष्यात व्यवसाय वाढविण्याची दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने अमेरिकन टेक कंपनी ऍपल इंक ही लवकरच भारतात आपले रिटेल स्टोअर उघडणार आहे. यासंदर्भात माहिती देताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक यांनी म्हटले आहे की, येत्या 2021 पर्यंत भारतात ऍपल पहिले रिटेल स्टोअर सुरु करणार आहे. कुक हे कॅलिफोर्नियामधील ऍपलच्या समभागधारकांच्या वार्षिक बैठकीच्या वेळी भारतामधील कंपनीच्या विस्तार व नवीन योजनांची माहिती देताना बोलत होते.
सदर बैठकीत एका प्रश्नाला उत्तर देताना कुक म्हणाले की ऍपलचे ऑनलाईन स्टोर भारतात चालू वर्षात (2020) सुरु होणार आहे. तर ऍपलचे भारतामधील ब्रँडेड स्टोर मात्र येत्या 2021 रोजी चालू करण्यात येणार असल्याचे सीईओनी सांगितले आहे. सध्या भारतामधील स्टोरसाठीच्या सरकारी निर्णयाच्या प्रतिक्षेत असून आम्ही कोणत्याही भागीदारी शिवाय हे काम करणार असल्याचे कुक यांनी स्पष्ट करताना आम्हाला ऍपलचे स्टोअर दुसरे कोणी चालवणे योग्य दिसणार नसल्याचेही म्हटले आहे.
पहिले स्टोअर मुंबईतच?
मागील वर्षात ऍपलकडून भारतामधील व्यवसायांच्या विस्तारांची आणि योजनांची माहिती दिली आहे. ही माहिती देताना कंपनीने सांगितले आहे, की आगामी दोन ते 3 वर्षात भारतात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच कंपनीचे पहिले रिटेल स्टोअर हे मुंबईतच उघडणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतरच दिल्लीमध्ये सुरु करण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.








