वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय स्मार्टफोन कंपन्यांसाठी 2021 हे हॅप्पीवाले वर्ष राहणार आहे. 2021 मध्ये भारतात स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये 20 टक्के वाढ दिसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
घरातून काम करण्याच्या मोहिमेमुळे अनेकजण मोबाईलमध्ये रस घेऊ लागले आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून जगातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे काम घरातूनच केले जात आहे. एकंदर कोरोनाच्या कालावधीमध्ये मोबाईलच्या मागणीमध्ये वाढ दिसली आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून आपल्या आप्तेष्टांशी कोरोनाकाळात अनेकांनी संपर्क साधला आहे. घरातून काम करण्याची संस्कृती वाढत असून तसेच मुलांना अभ्यासासाठी स्मार्टफोन जरूरीचा ठरत असल्यानेदेखील मोबाईलची मागणी वाढल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
2021 हे वर्ष स्मार्टफोनसाठी दोन अंकी वाढीचे असेल असे सांगितले जात आहे. स्मार्टफोन उद्योगातील तज्ञांनी पुढीलवषी स्मार्टफोनची बाजारपेठ 20 टक्क्मयांनी विकसित होण्याचा अंदाज स्पष्ट केला आहे. चीनवरचे अवलंबित्व कमी करण्याच्या भारताच्या आवाहनाला भारतीय कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. भारतीय उत्पादनांना येणाऱया काळात वाढती मागणी लक्षात घेऊन स्थानिक निर्मिती कंपन्यांनी स्मार्टफोन निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. बाहेरच्या कंपन्याही भारतामध्ये उत्पादन कारखाने स्थापन करण्याची तयारी करत आहेत. येणाऱया काळामध्ये स्मार्टफोनच्या स्पर्धेत अनेक कंपन्या धडपडताना दिसतील. लॉकडाऊनच्या काळात सवलत दिल्यानंतर मोबाइल विक्री वाढली आहे.
कंपन्यांची वाढती स्पर्धा
वाढती मागणीची दखल घेत अनेक कंपन्या स्मार्टफोन्स सादर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामध्ये रिलायन्स जिओने उडी घेतली असून त्यांचे स्वस्त 4 जी स्मार्टफोन्स लवकरच भारतीय बाजारात धडकणार असल्याचे बोलले जात आहे. मायक्रोमॅक्स ही कंपनीदेखील पुढच्यावषी या क्षेत्रात आपले स्मार्टफोन्स सादर करणार आहे. शाओमी इंडिया या कंपनीलाही पुढील वर्ष स्मार्टफोन्सच्या मागणीबाबतीत चांगले ठरणार असल्याचे सांगितले जाते.









