वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2021 साली होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क भारताने आपल्याकडे कायम राखले आहेत पण आयसीसीची महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा एक वर्षांसाठी म्हणजे 2022 सालापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.
कोरोना महामारी समस्येमुळे 2020 साली ऑस्ट्रेलियात होणारी पुरूषांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता 2022 सालापर्यंत लांबणीवर टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 2021 साली होणारी महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा एक वर्षांकरिता म्हणजे 2022 सालापर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. संपूर्ण जगामध्ये कोरोनाचा विळखा अधिक मजबूत होत असल्याने आयसीसीने आपल्या स्पर्धांपेक्षा क्रिकेटपटूंच्या आरोग्य सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले आहे. सदर माहिती आयसीसीचे कार्यरत चेअरमन इम्रान ख्वाँजा यांनी दिली. आयसीसीच्या स्पर्धांच्या कार्यक्रमात बदल करण्यापूर्वी बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया, क्रिकेट न्यूझीलंड तसेच या देशांच्या शासनाबरोबर चर्चा करूनच वरील निर्णय घेतला आहे. 2021 साली होणाऱया आयसीसीच्या पुरूषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या फॉमेंटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून ही स्पर्धा 2020 च्या स्पर्धेप्रमाणे घेतली जाईल. या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क भारताने आपल्याकडे कायम राखले आहे.
आयसीसीची महिलांची विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धा 2021 च्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान न्यूझीलंडमध्ये घेण्याचे ठरविले होते पण आता ही स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पात्रफेरी स्पर्धा 2021 मध्ये घेतली जाईल.









