ऑनलाईन टीम / तरुण भारत :
हैदराबादमध्ये 2019 साली झालेला चार बलात्काऱ्यांचा एन्काउंटर बनावट असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाने म्हटले आहे. तसेच याप्रकरणी दहा पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचा खटला चालवावा, अशी शिफारसही या आयोगाने केली आहे.
हैदराबादमध्ये 26 नोव्हेंबर 2019 च्या रात्री 27 वषीय पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तर 6 डिसेंबर रोजी पहाटे 3 च्या सुमारास पोलिसांनी चार आरोपींना संशयास्पद चकमकीत ठार केले होते. त्यानंतर काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाने यावर चौकशी आयोग नेमला होता. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या या न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर आयोगाने जानेवारी 2022 मध्ये यासंदर्भातील अहवाल सादर केला होता. या अहवालात चार बलात्काऱ्यांचा एन्काउंटर बनावट असल्याचे म्हटले आहे. आरोपींनी पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला, या पोलिसांच्या दाव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे आयोगाने म्हटले आहे. तसेच या चकमकीवर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. चकमकीत ठार झालेल्या चार आरोपींपैकी तीन शेख लाल मधर, मोहम्मद सिराजुद्दीन आणि कोचेरला रवी अल्पवयीन असल्याचे आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. या चकमकीप्रकरणी पोलिसांवर हत्येचा म्हणजेच 302 अंतर्गत खटला चालवावा, असेही आयोगाने अहवालात लिहिले आहे.
सरन्यायाधीश एनव्ही रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज या प्रकरणी सुनावणी केली. तेलंगणा सरकारकडून हा अहवाल गोपनीय ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ती विनंती फेटाळून लावत या प्रकरणी गुप्तता पाळण्याचे कोणतेही कारण नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी झाली असून, यामध्ये काही लोक दोषी आढळले आहेत. राज्य सरकारने आता चौकशी अहवालाच्या आधारे दौषींवर कारवाई करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.