पुणे / प्रतिनिधी :
पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा तत्कालीन संचालक प्रदीप कुरूलकर याच्या विरोधात दहशतवाद विरोधी पथकाने 2000 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात कुरुलकर याने पाकिस्तानी हेरांना कशा पद्धतीने माहिती पाठवली याबाबतचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, कुरुलकर याची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी ही तपासला दिशा देण्यासाठी असून, दोषी असल्याचा पुरावा म्हणून या चाचण्यांचा वापर केला जाणार नाही. तसेच दोषारोपपत्रात त्याचा उल्लेख असणार नाही असे सरकारी वकिलांनी शुक्रवारी चाचण्यांसंदर्भातील युक्तिवादावादावेळी सांगितले. पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणीच्या मागणीवर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद शुक्रवारी न्यायालयात पूर्ण झाला असून, याची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. त्यावेळी याबाबतचा निर्णय होण्याची शक्मयता आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) 4 मे रोजी डॉ. कुरूलकर याला अटक केली. सुरुवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी केली. दरम्यान, डॉ. कुरुलकरकडून तपासात अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्याची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी करण्याची मागणी एटीएस न्यायालयाकडे केली. त्यासाठीचा अर्ज एटीएसने न्यायालयाला सादर केला आहे. या प्रकरणात डॉ. कुरूलकर तपासात सहकार्य करत नसल्याने, तपासात गती येण्यासाठी या चाचण्या करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केला. यास बचाव पक्षाचे वकील ऍड. ऋषिकेश गानू यांनी विरोध केला आहे. या चाचण्या करण्याची आवश्यकता नाही. या चाचण्या करताना आरोपीला राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाडय़ाच्या आधारे या मागणीला विरोध करण्यात आला.