ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गडचिरोलीत नक्षलींच्या दोन समर्थकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 27 लाख 62 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 20 टक्के कमिशनचे आमिष दाखवून हे दोघेही दोन हजारांच्या नोटा बदलून घेत होते.
रोहित कोरसा आणि विप्लव सिकंदर अशी या आरोपींची नावे असून, यामधील एकाचे जुने नक्षल कनेक्शन समोर आले आहे. हे दोघेही 20 टक्के कमिशनचे आमिष दाखवून लाखो रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा लोकांकडून बदलून घेत होते. नक्षलींनी खंडणीच्या स्वरूपात मोठे व्यापारी, कंत्राटदार आणि इतरांकडून वसूल केलेली रक्कम दोन हजाराच्या नोटांच्या स्वरूपात आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून घेण्याचा निर्णय जारी केला आहे. त्यामुळे नक्षलींची कोंडी झाली आहे. ही कोटय़वधींची रक्कम टप्प्याटप्प्यांमध्ये बदलून घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी 20 टक्के कमिशन देणे सुरू केले आहे.
गडचिरोली पोलिसांना अहेरीजवळ दोन नक्षल समर्थक या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. दुचाकीवरुन आलेल्या दोन संशयितांना थांबवून पोलिसांनी त्यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये 27 लाख 62 रुपयांची रोकड सापडली. त्यामध्ये काही 500 आणि 2000 हजारच्या नोटा होत्या. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, चौकशीदरम्यान हे पैसे नक्षलवाद्यांचे असल्याची कबुली त्यांनी दिली.