पार्किंगमधील गाड्यांना शॉर्ट सर्किटमुळे आग
वृत्तसंस्था/ वाराणसी
वाराणसी कॅन्ट रेल्वेस्थानकाच्या पार्किंगमध्ये घडलेल्या अग्नितांडवाच्या दुर्घटनेत 200 वाहने जळून खाक झाली. आगीच्या भडक्यात दुचाकींमधील इंधनटाक्या जवळपास एक ते दीड तास फुटत होत्या. या स्फोटाच्या आवाजाने प्रवाशांची इकडे-तिकडे धावपळ सुरू झाल्याने रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरीही झाली. सुदैवाने या घटनेत कोणी ठार किंवा जखमी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. शॉर्टसर्किटमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
धार्मिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीमध्ये शनिवारी पहाटे आगीची मोठी घटना घडली. येथील वाराणसी कँट रेल्वेस्थानकाच्या पार्किंगमध्ये आग लागली. पार्किंग परिसरात लागलेल्या आगीमुळे किमान 200 हून अधिक वाहने जळून खाक झाली. याचा व्हिडिओही समोर आला असून त्यात जळालेली वाहने दिसत आहेत. पार्किंग परिसरात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. तथापि, 200 हून अधिक वाहने जळून खाक झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आग विझविण्यासाठी रेल्वे पोलीस (जीआरपी), रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि स्थानिक पोलीस पथकासह अग्निशमन दलाच्या सुमारे 12 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दुचाकींसोबत काही सायकलीही जळाल्या आहेत. या घटनेत जळालेल्या बहुतांश दुचाकी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आणि रेल्वे प्रवाशांच्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेचा अधिक तपास केला जात आहे.









