गोपनीय माहिती चीनला विकल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ अटारी
पाकिस्तानने शनिवारी 200 भारतीय मच्छिमारांची सुटका केली. त्यांना अटारी-वाघा सीमेवरील जॉइंट चेक पोस्टवर बीएसएफ अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. या मच्छिमारांच्या बोटी कथितरित्या अरबी समुद्रातील पाकिस्तानी हद्दीत गेल्यानंतर पाकिस्तानने त्यांना अटक केली होती. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.
यापूर्वी गेल्या महिन्यात पाकिस्तानने 198 भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती. पहिल्या टप्प्यातील मच्छिमारांची सुटका करतानाच पाकिस्तानने आणखी दोन तुकड्या जून आणि जुलैमध्ये सोडल्या जातील, असे मालीर कारागृहाचे अधीक्षक नझीर तुनियो यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये आणखी 100 जणांची सुटका होणार आहे.
सुटका करण्यात आलेले भारतीय मच्छिमार चुकून पाकिस्तानच्या समुद्री हद्दीत घुसल्यानंतर त्यांना पाकिस्तानी नौदलाने ताब्यात घेतले होते. अरबी समुद्रात मासेमारी करताना मच्छीमार पारंपरिक बोटींचा वापर करतात. त्यांच्याकडे अत्याधुनिक दिशादर्शक यंत्रणा नसल्यामुळे त्यांचे अचूक स्थान समजू शकत नाही. समुद्रामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये स्पष्ट सीमा नाही. अशा परिस्थितीत दोन्ही देशांचे मच्छीमार चुकून एकमेकांच्या सीमेत घुसतात. या कारणास्तव संबंधित देशांचे नौदल अन्य देशांतील मच्छिमारांना पकडून त्यांच्या बोटीही जप्त करतात. पाकिस्तानप्रमाणेच भारतही आपल्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानसह अन्य देशांच्या मच्छिमारांवर वेळोवेळी कारवाई करत असतो. भारतीय तुरुंगातही पाकिस्तानी मच्छिमार कैद असून त्यांना शिक्षा कालावधी पूर्ण केल्यानंतर पाकिस्तानच्या हवाली केले जाते.