वृत्तसंस्था/ शिमला
पूर, पाऊस आणि भूस्खलन यांसारख्या आपत्तींनी त्रस्त असलेल्या हिमाचल प्रदेशला केंद्र सरकारच्या निधीतून 200 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने हिमाचल प्रदेशला 200 कोटी ऊपयांची आगाऊ रक्कम मंजूर केली आहे. ही रक्कम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन (एनडीआरएफ) निधी अंतर्गत देण्यात आली आहे. यापूर्वी मोदी सरकारने हिमाचल प्रदेशला दोन हप्त्यांमध्ये 360 कोटी रुपये दिले होते. त्याचवेळी 7 ऑगस्टलाही केंद्र सरकारने हिमाचल सरकारला 190 कोटी दिले होते. केंद्रातील मोदी सरकार हिमाचलमधील आपत्तीवर लक्ष ठेवून आहे. सध्या एनडीआरएफच्या 20 आणि लष्कराच्या 20 तुकड्या मदत आणि बचावकार्यात गुंतल्या आहेत. तसेच हवाई दलाच्या 3 हेलिकॉप्टरची मदतही पुरविली जात आहे.
केंद्रातील मोदी सरकारने कोणताही प्रस्ताव नसतानाही नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी हिमाचल सरकारकडे पथके पाठवली आहेत. या पथकांनी 19 ते 21 जुलै या कालावधीत राज्याचा दौरा केला आहे. 24 जून रोजी मान्सून हिमाचल प्रदेशात दाखल झाला. तेव्हापासून राज्यात प्रचंड विध्वंस झाला असून सुमारे 340 लोकांचा मृत्यू झाला आहे. या आपत्तीमध्ये राज्याचे 10,000 कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.









