काश्मीरमधील फुटिरवाद्यांना वित्तपुरवठा केल्याचा आरोप ः दहशतवाद्याची मालमत्ताही गोठविली
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये फुटिरवाद्यांना वित्तपुरवठा करणारी प्रतिबंधित संघटना जमात-ए-इस्लामीची 200 कोटी रुपयांची संपत्ती राज्य तपास यंत्रणेने जप्त केली आहे. ही कारवाई गांदरबल, बांदीपोरा, कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्हय़ांमध्ये करण्यात आली आहे.

दहशतवादी संघटनांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी तपास यंत्रणा मागील काही काळापासून केंद्रशासित प्रदेशात जोरदार कारवाई करत आहे. याच्या अंतर्गत आतापर्यंत 200 कोटी रुपयांची संपत्ती सील करण्यात आली आहे. जमात-ए-इस्लामीने मागील 30 वर्षांमध्ये काश्मीर खोऱयात स्वतःचे विशाल आर्थिक साम्राज्य उभे केले आहे. यात भूखंड, शॉपिंग मॉल आणि शाळांसमवेत मोठय़ा प्रमाणात अचल संपत्तींचा समावेश आहे.
188 संपत्तींची ओळख पटविली
सुरक्षा यंत्रणांनी सुमारे 188 संपत्तीची ओळख पटविली आहे. याची किंमत सुमारे 1 हजार कोटी रुपये इतकी आहे. या सर्व संपत्तींना लवकरच जप्त केले जाणार आहे. तसेच बँक खात्यांबद्दल माहिती मिळविल्यावर ती गोठविण्यात येतील असे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.
300 शाळांवर बंदी
जमात-ए-इस्लामीकडून काश्मीरखोऱयात 300 हून अधिक शाळा चालविल्या जात होत्या. या शाळांवर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दहशतवाद किंवा फुटिरवादाच्या दरीत ढकलले जात होते असा संशय तपास यंत्रणांना होता.
लष्कर-ए-तोयबा विरोधात कारवाई
काश्मीरच्या डोडामध्ये अधिकाऱयांनी लष्कर-ए-तोयबाचा फरार कमांडर अब्दुल राशिद उर्फ जहांगीरची संपत्ती गोठविली आहे. अब्दुल सध्या सीमेपलिकडून काश्मीर खोऱयात दहशतवाद फैलावू पाहत आहे. डोडा जिल्हय़ातील खानपुरा गावात असलेल्या त्याच्या संपत्तीवर न्यायदंडाधिकाऱयांच्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया करत असलेल्या सर्व लोकांच्या विरोधात कारवाई होणार आहे. दहशतवादाचे हे हस्तक सोशल मीडियाद्वारे तरुणांना भडकविण्याचे काम करत असल्याचे पोलीस अधीक्षक अब्दुल कयूम यांनी म्हटले आहे.
दहशतवादी कारवायांमध्ये घट सर्जिकल स्ट्राइकसह सरकारने उचललेल्या अन्य कठोर पावलांमुळे 2014 नंतरच्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये 168 टक्क्यांची घट झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारीच केला होता.









