एकूण 56.82 टक्के मतदारांनी बजावला हक्क
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील 48 जिल्हा पंचायतींसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 56.82 टक्के मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत मतदान झाले. उत्तर गोव्यातील 58.43 टक्के तर दक्षिणेतील 55 टक्के मतदारांनी आपला कौल दिला. उत्तर गोव्यातील पाळी मतदारसंघात सर्वाधिक 77.39 टक्के तर हळदोणे मतदारसंघात सर्वात कमी 42.64 टक्के मतदान झाले. दक्षिण गोव्यात बार्शे मतदारसंघात सर्वाधिक 75.90 टक्के तर राय मतदारसंघात सर्वात कमी 37.77 टक्के मतदान झाले. त्याद्वारे सुमारे 200 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले आहे. आता उद्या दि. 14 रोजी मतमोजणी होऊन उमेदवारांच्या नशिबाचा फैसला जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली. उत्तर गोव्यातील 25 आणि दक्षिण गोव्यातील 23 मिळून 48 जिल्हा पंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात आली. दक्षिण गोव्यातील सांकवाळ मतदारसंघाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. तर नावेलीतील उमेदवाराचे निधन झाले होते. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात निवडणूक घेण्यात आली नाही. या मतदान प्रक्रियेसाठी एकूण 1187 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पाडण्यात सहकार्य केल्याबद्दल निवडणूक आयुक्त श्री. गर्ग यांनी गोमंतकीय जनतेचे अभिनंदन केले. तसेच या प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस, सुरक्षा रक्षक यांचे आभार व्यक्त केले. सर्वात समाधानकारक बाब म्हणजे एकूण 31 कोरोनाग्रस्त रुग्णांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात उत्तर गोव्यातील 15 आणि दक्षिण गोव्यातील 16 रुग्णांचा समावेश होता, असेही गर्ग यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सांखळी मतदारसंघातील पाळी जिल्हा पंचायत मतदारसंघात सर्वाधिक 77.39 टक्के मतदान झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे. डॉ. सावंत आणि पत्नी सुलक्षणा सावंत यांनी आपल्या मूळ गावी कोठंबी पाळी येथे जाऊन सकाळी मतदान केले. त्यानंतर त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक बूथवर भेट देऊन मतदारांना प्रोत्साहन दिले.
डिचोली तालुक्यातील सर्वण कारापूर मतदारसंघाच्या मावळिंगे प्रभागातील 1150 नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला. सायंकाळपर्यंत केवळ दोघां बीएलओनीच मतदान केले. त्यामुळे हे मतदानकेंद्र ओस पडले होते. जमिनीच्या वादातून हा बहिष्कार टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.









