- जीवाला धोका : वाघा सीमेवरून भारतात दाखल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून वादंग निर्माण झाले असताना पाकिस्तानातून अनेक हिंदू भारतात दाखल झाले आहेत. सुमारे 200 पाकिस्तानी हिंदू अटारी-वाघा सीमेवरून भारतात पोहोचले असून ते आता पाकिस्तानात जाण्यास तयार नाहीत. पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत.
सुमारे 50 हिंदू कुटुंबे वाघा सीमेच्या मार्गाने भारतात पोहोचली आहेत. हे सर्व 25 दिवसांच्या व्हिसावर भारतात आले असून हरिद्वार येथे जाऊ पाहत आहेत. पाकिस्तानात असुरक्षित वातावरण असल्याने तेथे परतण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अकाली दलाचे नेते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी या सर्वांचे वाघा सीमेवर स्वागत केले आहे. पाकिस्तानात धार्मिक छळाला तोंड देणारे हे लोक आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचे आवाहन करणार असल्याचे सिरसा म्हणाले.
भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यापासून पाकिस्तानातून येणाऱया हिंदूंची संख्या वाढल्याचे सीमेवरील अधिकाऱयांनी म्हटले आहे. मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कायद्याच्या अंतर्गत पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधून आलेले हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी शरणार्थींना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे.
सोमवारी भारतात दाखल झालेली हिंदू कुटुंबे ही कराची, सिंध प्रांतात राहणारी आहेत. यातील काहीजण राजस्थानातील नातलगांना भेटण्यास जाणार आहेत. पाकिस्तानात आता सुरक्षितता नाही, पोलिसांसमोरच कुणाचेही अपहरण केले जाते. उत्तर-पश्चिम पाकिस्तानात हिंदू महिला सुरक्षित नसल्याचे एका हिंदूने म्हटले आहे.









