मुकेश यांच्या नेतृत्वाची झलक ः उत्पन्न, मालमत्ता, बाजारमूल्यात उच्चांकी कामगिरी
नवी दिल्ली ः मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाला 20 वर्षे पूर्ण केली आहेत. बुधवारी धीरूभाई अंबानी यांची जयंती साजरी झाली याचदरम्यान मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून 20 वर्षे पूर्ण केली आहेत. रिलायन्ससाठी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाची 20 वर्षे अतुलनीय अशीच राहिली आहेत. यामध्ये 20 वर्षात कंपनीची निव्वळ संपत्ती, नफा, कंपनीचे उत्पन्न, मालमत्ता, बाजारमूल्य आदी टप्प्यावर प्रचंड वाढ झाली आहे.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दशकात कंपनीचे उत्पन्न आणि एकूण संपत्ती या दोन्हींमध्ये वाढ झाली आहे. कंपनीचे उत्पन्न तर वाढलेच पण गुंतवणूकदारांनाही मोठा फायदा झाला. या 20 वर्षात गुंतवणूकदारांना 17.4 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली फेसबुक, गुगल आणि बीपी सारख्या कंपन्यांनी रिलायन्समध्ये गुंतवणूक केली आहे.
मुकेश अंबानींची कमाल
मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखाली रिलायन्सचा महसूल 20 पटीने वाढला आहे. 2002 मध्ये रिलायन्स उद्योगाचे बाजारमूल्य 41989 कोटी होते, ते चालू वर्षात 17 लाख 81 हजार 841 कोटींवर पोहोचले आहे. रिलायन्सच्या उत्पन्नाच्या आकडय़ांवर नजर टाकल्यास, 2001-02 या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न 45411 कोटी होते, जे 2021-22 या आर्थिक वर्षात 7 लाख 92 हजार 656 कोटींवर पोहोचले आहे. त्याचवेळी, कंपनीचा नफा 2001-02 या आर्थिक वर्षात 3280 कोटींवरून 67 हजार 845 कोटींवर पोहोचला आहे.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठय़ा टेलिकॉम कंपन्यांपैकी एक म्हणून उदयास आली आहे. जिओने डाटा क्षेत्रात क्रांती केली आहे. पूर्वी 250 रुपये प्रति जीबी दराने मिळणारा डेटा आता 10 रुपये प्रति जीबीवर आला आहे. केवळ किंमतच कमी झाली नाही तर डाटा वापरानेही मोठी झेप घेतली आहे, ज्याचे श्रेय जिओला जाते.









