दोन दिवसांपासून शाहूवाडी दक्षिण भागातील कासारी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्य़ाने पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून ती धोक्या्च्या पातळीवरून वाहत आहे. अशातच बर्की धबधबा पाहण्यासाठी गेलेले शाहूवाडीचे पर्यटक अडकून बसल्याची बातमी येत आहे.
कासारी नदीवरील बर्की बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. बर्की धरण पाण्याखाली गेल्याने नदीच्या पलीकडील बर्की, बुराणवाडी, बर्की धनगरवाडा येथील लोकांचा संपर्क तुटला आहे. शाहूवाडी तालुक्यातील काही पर्यटक बर्की धबधबा पहायला आज सकाळी गेले होते. पण दुपारनंतर वाढत्या पाणी पातळीमुळे ते पर्यटक अडकले आहेत. बर्की गावात जवळपास 20 पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती येत असून कोल्हापूर जिल्ह्यात रांगणा किल्ल्यानंतर आणखी असा प्रकार घडला आहे. पर्यटक धबधब्याकडे जाऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.









