कोल्हापूर :
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करायचे म्हंटले की, अनेकांचा घरोघरी मांसाहाराचा बेत असतोच. त्यापाठोपाठ हॉटेल व पर्यटनस्थळी रंगीत संगीत पार्ट्यांचे नियोजन असते. यंदा थर्टी फर्स्टला खवय्यांकडून 20 टन चिकन, 15 टन मासे फस्त करण्यात आले. त्यापाठोपाठ 10 टन मटनाची विक्री झाली.
चिकनपेक्षा मटनाचे दर अधिक असल्याने तसेच चिकनची अनेक रेसीपी केल्या जात असल्याने मटनापेक्षा चिकनला जास्त मागणी होती. खवय्यांकडून मासा फ्रायला अधिक पसंती असल्यामुळे माशांनाही चांगली मागणी होती. थर्टीफर्स्टच्या स्वागतासाठी सर्वत्र मांसाहाराचा घमघमाट पहायला मिळाला.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मालवण, सिंधूदुर्ग, देवगड, रत्नागिरी, गोवा, जयगड, मुंबई आदी भागातून सोमवारी (ता.30) समुद्री माशांची मोठी आवक झाली होती. खवय्यांकडून सुरमई माशाला अधिक पसंती जात होती. सुरमईची आवक कायम राहील्याने दरही स्थिर राहीले होते. सुरमईचा प्रतिकिलोचा दर 700 ते 1 हजार रूपये असा आहे. तर बेबी सुरमई मासा 400 रूपये प्रतिकिलो आहे. आकाराने लहान असल्याने याला मागणी कमी होती. सुरमई पाठोपाठ बांगडा माशाला मागणी अधिक होती. समुद्री माशांसह गोड्या पाण्यातील माशांनाही मागणी अधिक राहीली. पंचगंगा नदी, शिरोळ, प्रयाग चिखली, कर्नाटक आदी भागातून गोड्या पाण्यातील माशांची आवक झाली. गोड्या पाण्यातील टिलाप, पानगा, रहू माशाला मागणी जास्त होती.
हॉटेल फूल्ल
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंटचे बुकींग झाले होते. हॉटेलमध्ये मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले असल्याने चिकन, मटन, माशांना हॉटेलमध्ये नेहमी पेक्षा चारपटीने मागणी होती. त्यातच शासनाने हॉटेल व बारना पहाटे पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिल्याने मांसाहाराची उलाढाल अधिक झाली.
सकाळपासूनच मटनासाठी रांगा
31 डिसेंबर साजरा करण्यासाठी मांसाहाराचा बेत आखला जात होता. सायंकाळी मटन खरेदीला गर्दी होणार याचा अंदाज घेवून बहुतांश नागरिक सकाळीच मटन खरदीसाठी बाहेर पडले होते. शहरातील मटन मार्केटसह उपनगरातील मटन दुकानांमध्ये सकाळी सात वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या. सायंकाळपर्यंत मटन दुकानांमध्ये गर्दी कायम होती होती. काहीजणांनी दुकानदारांना सांगून मटनाचे बुकींग करून ठेवले होते.
मागणी अधिक, दर स्थिर
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मांसाहाराची चांगली उलाढाल झाली. सकाळपासूनच खरेदीसाठी मटन मार्केटमध्ये गर्दी होती. चिकन, मटनसह समुद्री व गोड्या पाण्यातील माशांना अधिक मागणी होती. कोकणसह मुंबईतून सागरी माशांची तर जिल्ह्यातील आसपासच्या भागातून गोड्या पाण्यातील माशांची आवक चांगली राहील्याने दर स्थिर राहीले.
मोहसिन हेर्लेकर, मासे विक्रेते
माशांचे दर (प्रतिकिलोमध्ये)
सागरी मासे : सुरमई : 700 ते 1000 रूपये, बेबी सुरमई : 400 रूपये, पापलेट : 800 ते 1000 रूपये, बांगडा : 160 ते 200 रूपये, झिंगा : 300 ते 500 रूपये, तार्ली : 200, सारंग : 600 ते 800 रूपये, बेंबिल : 300 ते 400 रूपये, मोडूसा : 400 ते 600 रूपये.








