गोवावेस परिसरात मुधोळच्या कुटुंबाला फटका : टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
बेळगाव : रस्त्याशेजारी उभ्या करण्यात आलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी 20 तोळे सोने व कपडे असलेली बॅग पळविल्याची घटना मंगळवारी रात्री गोवावेसजवळ घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून बुधवारी टिळकवाडी पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुधोळ, जि. बागलकोट येथील डॉ. गिरीश यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री 8 ते 9 या वेळेत ही घटना घडली असून ब्रिझा कारच्या पाठीमागील काच फोडून किमती ऐवज असलेली बॅग पळविण्यात आली आहे. घटनेची माहिती समजताच टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. भामट्यांनी सुमारे 10 लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने व इतर किमती वस्तू पळविल्या आहेत. नातेवाईकांच्या लग्न समारंभात भाग घेण्यासाठी डॉ. गिरीश यांचे भाऊ किशोर व कुटुंबीय ऑस्ट्रेलियाला निघाले होते. मुधोळहून ब्रिझा कारमधून हे कुटुंबीय मंगळवारी रात्री बेळगावला आले. अग्निशमन दलाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर कार उभी करून नाष्टा करण्यासाठी ते खाऊ कट्ट्यावर पोहोचले. रेल्वेने बेंगळूरला जाऊन तेथून विमानाने सिडनीला जाण्याचा त्यांचा बेत होता. नाष्टा करून हे सर्वजण रेल्वेस्थानकाकडे जाणार होते. किशोर व त्यांचे कुटुंबीय 9 वाजण्याच्या सुमारास आपण कार उभी केलेल्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी कारच्या डाव्या बाजूची पाठीमागील काच फोडल्याचे निदर्शनास आले. कारच्या सीटवर ठेवलेले दागिने, कपडे व इतर किमती वस्तू असलेली बॅग पळविल्याचे लक्षात आले. हा प्रकार उघडकीस येताच किशोर यांनी तातडीने टिळकवाडी पोलिसांना याची माहिती दिली. ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढल्यामुळे ते पोलिसांना घटनेची माहिती देऊन बेंगळूरला रवाना झाले. मुधोळ येथील त्यांचे भाऊ डॉ. गिरीश यांनी बुधवारी यासंबंधी फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.









