वृत्तसंस्था /नवी दिल्ली
लिबिया देशात चार दिवसांपूर्वी झालेल्या भीषण चक्रीवादळात किमान 20 हजार लोक ठार झाले असावेत, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहेत. किमान 50,000 लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. मृतांची अधिकृत संख्या 7 हजारांहून अधिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी, हा आकडा प्रत्यक्षात घडलेल्या जीवीतहानीपेक्षा कितीतरी लहान असल्याचे स्थानिक पत्रकार आणि तज्ञांचे मत आहे. दाट लोकवस्तीची दोन शहरे पूर्णत: उध्वस्त झाली आहेत. तसेच अनेक खेड्यांमध्येही हाहाकार माजला आहे. सर्वाधिक हानी झालेल्या डेर्ना शहराच्या महापौरांनी मृतांचा आकडा किमान 20 हजार असल्याची माहिती दिली. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासही माणसे मिळेनाशी झाली आहेत. त्यामुळे मृतदेह सडण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणची रुग्णालये अद्यापही बंद असल्याने आजारी लोकांची तारांबळ उडाल्याची माहिती आहे.
स्थानिकांचा पुढाकार
अनेक ठिकाणी स्थानिक नागरीकांनी स्वबळावर साहाय्यता कार्य सुरु केले आहे. वादळग्रस्त लोकांना अनेक नागरीकांनी स्वत:च्या खर्चाने आश्रय दिला आहे. त्यांच्या खाण्याची आणि औषधपाण्याची व्यवस्था स्थानिक नागरीकांच्या संस्था करीत आहेत. सरकारी साहाय्य पोहचण्याच्या आधीच स्थानिकांनी साहाय्यता कार्य सुरु केल्याने परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे.
ईजिप्तकडून साहाय्य सामग्री
ईजिप्त, कतार आणि तुर्किये या देशांनी काही प्रमाणात साहाय्यता सामग्री पाठविली असून ती वादळाच्या ठिकाणी पोहचली आहे. शासकीय यंत्रणेद्वारे ती वादळग्रस्तांना पुरविली जात आहे. या देशांनी डॉक्टर्स आणि आपत्कालीन साहाय्यता कर्मचाऱ्यांनाही पाठविले असून त्यांनी कार्य सुरु केले आहे.
लाखो लोक बेघर
या वादळामुळे लाखो लोकांची घरे उध्वस्त झाली असून त्यांना आश्रयछावण्यांमध्ये रहावे लागत आहे. लहान मुले आणि महिला विस्थापितांची संख्याही मोठी आहे. त्यांना अन्नपाणी आणि औषधे पुरविली जात असली तरी काही भागांमध्ये या जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे.









