ठसे तज्ञ, श्वान पथकाकडून तपास
निपाणी : निपाणीतील चिमगावकर गल्ली येथील रफिकअहमद पटेकरी यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी तिजोरीतील तीन लाखाची रोकड, 25 तोळ्याचे सोन्याचे दागिने व अन्य किमती साहित्य लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. भरवस्तीत चोरीची घटना घडल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर चोरीत चोरट्यांनी सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत घटनास्थळावरून तसेच निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, रफिकअहमद पटेकरी हे घरातून दुकानकडे मंगळवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास बाहेर पडले होते. तर त्यांच्या घरातील इतर मंडळी बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी पटेकरी यांच्या शेजारच्या घरातून शिडीवरून चढून घराच्या मागील दरवाज्यातून आत प्रवेश केला. यानंतर सोबत आणलेल्या साहित्य आणि हत्याराच्या साहाय्याने तिजोरी फोडली. घटनेची माहिती निपाणी शहर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार सीपीआय बी. एस. तळवार, निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
या घटनेतील चोरटा पटेकरी यांच्या घरच्या सीसीटीव्हीत मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास कैद झाला आहे. तिजोरी फोडण्यासाठी आणलेली हत्यारे तिथेच टाकून चोरट्याने पळ काढला आहे.









