पुणे / वार्ताहर :
क्रेडिट कार्ड अपडेट केल्यावर त्यावर शून्य टक्क्याने कर्ज मंजूर होईल, असे सांगून एका नागरिकाची तब्बल 20 लाख 19 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात सहा मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भानुदास विश्वनाथ यादव (वय 42, रा. कोरेगाव, ता. हवेली, पुणे) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकार 20 एप्रिल 2020 ते 10 जुलै 2022 दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भानुदास यादव यांच्याकडे असलेल्या वेगवेगळया बँकाचे क्रेडिट कार्ड अपडेट केल्यानंतर त्यांना शून्य टक्के व्याजदर असलेली पॉलिसी लागू होईल, असे सांगून आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या आठ क्रेडिट कार्डचा वापर करुन आरोपींनी तक्रारदार यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन 20 लाख 19 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. याबाबत तक्रारदार यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करुन याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना विश्रांतवाडी पोलिसांना दिल्याने विलंबाने गुन्हा दाखल झाला. याबाबत पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.








