हेस्कॉमच्या कार्यक्षेत्रातील वीजग्राहकांची अजूनही नोंदणी सुरूच
बेळगाव : राज्य सरकारने घरगुती ग्राहकांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गृहज्योती योजनेसाठी बेळगावसह हेस्कॉमच्या विविध विभागांतून मोठ्या प्रमाणात नावनोंदणी करण्यात आली आहे. सध्या हेस्कॉमकडे 20 लाखांहून अधिक ग्राहकांनी गृहज्योतीसाठी नावनोंदणी केली आहे. सर्व्हरडाऊन असतानाही मोठ्या प्रमाणात नावनोंदणी झाली असून अद्यापही सेवासिंधूद्वारे नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. राज्यातील नागरिकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात आली होती. काँग्रेस सरकार सत्तेत येताच त्यांनी या योजनेला हिरवा झेंडा दाखविला. घरगुती ग्राहकांना सेवासिंधूद्वारे नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. दि. 18 जूनपासून गृहज्योती योजनेच्या नावनोंदणीला सुरुवात झाली. ग्राहकांनी मागील वर्षभरात वापरलेल्या विजेची सरासरी काढून त्यानंतर त्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. जर सरासरीपेक्षा अधिक विजेचा वापर झाल्यास त्यांना ते बिल भरावे लागणार आहे.
बेळगाव वन, ग्राम वन, हेस्कॉम कार्यालय याचबरोबर मोबाईलवरूनही योजनेसाठी नावनोंदणी करण्यात येत आहे. हेस्कॉम कार्यक्षेत्रात आतापर्यंत 20 लाख ग्राहकांनी नावनोंदणी केली आहे. सुरुवातीचे काही दिवस सर्व्हरडाऊन असल्यामुळे नावनोंदणी करताना अडचणी येत होत्या. परंतु, जसजशी ग्राहकांची संख्या कमी होत गेली तसतशी सर्व्हरडाऊनची समस्या कमी झाली. सध्या मोबाईलवरूनही गृहज्योतीसाठी नोंदणी करता येत आहे. ऑगस्ट महिन्यापासून गृहज्योतीच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी ग्राहकांना मागील थकबाकी भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे हेस्कॉमच्या बिलभरणा केंद्रांवर मागील थकबाकी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे.









