सरकारी शाळांमध्ये मोफत वाटप : खासगी-अनुदानित शाळांसाठी 5 लाख 76 हजार पुस्तकांची मागणी
बेळगाव : शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला असून, बुधवारपासून विद्यार्थी शाळांमध्ये दाखल झाले. शिक्षण विभागाने सांगितल्याप्रमाणे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तकांचे वितरण करण्यात आले. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना एकूण 20 लाख 99 हजार 459 मोफत पुस्तकांचे पहिल्याच दिवशी वितरण झाले. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोयीचे होणार आहे. राज्य सरकारकडून सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तकांचे मोफत वितरण केले जाते. मागीलवर्षी पाठ्याक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावरून बराच वादंग निर्माण झाला. त्यामुळे अनावश्यक भाग वगळण्यासाठी पुस्तकांची छपाई उशिराने झाली. अर्धे शैक्षणिक वर्ष उलटले तरी विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तके मिळाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक व शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत होती. यावर्षी मात्र विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक सरकारी शाळेला पाठ्यापुस्तकांचे वितरण करण्यात आले. सोमवार दि. 29 मे पासून 2023-24 या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. बुधवारी विद्यार्थी शाळांमध्ये दाखल झाले. शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तकांचे वितरण करण्यात आले. मराठी, कन्नड व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तके देण्यात आली.
खासगी-अनुदानित शाळांमध्येही वितरण
खासगी व अनुदानित शाळांना पाठ्यापुस्तके विकत घ्यावी लागली. एकूण 5 लाख 76 हजार पुस्तकांची मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पुस्तकांची रक्कम जमा केलेल्या शाळांना पाठ्यापुस्तके देण्यात आली.









