पुणे / वार्ताहर :
लोणावळा ग्रामीण परिसरात एका टेम्पोतून 20 गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालकासह दोघांना अटक केली आहे.
अशोक भुजंग चव्हाण (43, रा. धामणी, खालापूर, रायगड), शंकर भगवान साळुंखे (30, रा. ठोंबरेवाडी, लोणावळा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या टेम्पोतून गांजा वाहतूक होत असल्याची माहिती लोणावळ ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी केतन तळपे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून टेम्पोचालक चव्हाण आणि साळुंखे यांना ताब्यात घेतले. टेम्पोची पाहणी करण्यात आली. त्यावेळी टेम्पोत 20 किलो गांजा आढळून आला. टेम्पोसह 20 किलो गांजा असा एकूण 6.50 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
परदेशी नागरिकाकडून 1 लाख 20 हजारांचे कोकेन जप्त
अमली पदार्थ विरोधी पथक 1 ने परदेशी नागरिकाला ताब्यात घेत त्यांच्याकडून 1 लाख 20 हजारांचे कोकेन जप्त केले. पॅट्रीक अॅमोस उर्फ बोरा (39, रा. मोरया पार्क, पिंपळे गुरव, मूळ रा. साऊथ आफ्रिका) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला विश्रांतवाडी येथील बॉम्बे सॅप्रस एडी एम बटालियन समोरून कोकेनची विक्री करताना अटक करण्यात आली.









