मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती : गावचा सर्वांगिण विकास होणार : हिंडलगा येथील तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट
वार्ताहर/ हिंडलगा
कर्नाटक राज्य सरकारकडून हिंडलगा ग्राम पंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठीच्या प्रयत्नाला यश आले. या नगरपंचायतीला प्रत्येकवर्षी 20 कोटींचा निधी मिळणार असून अल्पावधीतच गावचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी 100 बेडचे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले असून जनतेला सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. ग्राम पंचायतीचा सर्व कर्मचारीवर्ग सरकारी सेवेत रुजू होऊन कर्मचारी संख्या वाढणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. गोकुळनगर, हिंडलगा येथील ‘तरुण भारत’ समोरील रस्ताकामाचा शुभारंभ करून ‘तरुण भारत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या. तसेच या भागातील बेनकनहळ्ळी व पूर्व भागातील हिरेबागेवाडी या ग्राम पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. मण्णूर येथील प्रशस्त जागेत ग्रामीण भागात प्रथमच कॅन्सर हॉस्पिटल मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.
‘तरुण भारत’ला सदिच्छा भेट दिली असताना संपादक विजय पाटील यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुष्पगुच्छ देऊन तरुण भारत परिवारातर्फे स्वागत केले. यावेळी व्यवस्थापक गिरीधर रवीशंकर उपस्थित होते. नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाल्याने जनतेला सर्व प्रकारच्या सेवांबरोबर गावचा विकास अल्पावधीत होईल. महानगरपालिकाऐवजी नगरपंचायतमुळे विकास होण्यास मदत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, तसेच ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वार्ताहर प्रकाश बेळगुंदकर यांनी ग्राम पंचायत क्षेत्राच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला व आभार मानले.









