शेतकऱ्यांना खासगी यंत्र सामुग्रीवर अवलंबून राहण्याची वेळ
बेळगाव : शेतकऱ्यांना कमी भाडेदरात यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली कृषी यंत्र सामुग्री योजना राज्यात व्यवस्थापनाअभावी रखडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील 33 पैकी 20 केंद्रे सध्या बंद पडली आहेत. त्यामुळे याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत असून, महागड्या दराने शेती अवजारे भाड्याने घ्यावी लागत आहेत. कृषी विभागाने राज्यात 697 केंद्रे सुरू केली होती. एका विभागासाठी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी खासगी कंपन्यांकडे दिली होती. सध्याच्या 697 केंद्रापैकी जवळपास 500 केंद्रे बंद आहेत. कृषी यंत्रसामुग्री वितरण केंद्राच्या देखभालीसाठी खासगी कंपन्या जबाबदार होत्या. त्यासाठी प्रत्येक 28 लाख रुपये अनुदान या कंपन्यांना मिळाले. यामध्ये धर्मस्थळ ग्राम विकास योजनेची केंद्रे पुरेशा प्रमाणात सुरू आहेत. मात्र इतर खासगी संस्थांनी तोट्याचे कारण पुढे करून केंद्र बंद करत हात धुवून घेतले आहेत. कृषी यंत्रसामुग्री योजनेंतर्गत ट्रॅक्टर, नांगर, मोठे नांगर, रोटर, कल्टीवेटर, झाडे लावण्यासाठी खोदणारी यंत्रे व इतर सामुग्री एकाच ठिकाणी 50 टक्के कमी दरात भाड्याने उपलब्ध होती. बेळगाव जिल्ह्यात 2014 मध्ये 33 केंद्रे सुरू करण्यात आली होती. यापैकी 20 केंद्रे बंद आहेत. त्यामुळे यंत्रसामुग्री विभागीय कार्यालयामध्ये गंज खात पडले आहेत.
केवळ त्यांना यंत्रसामुग्री देऊ
कृषी यंत्र योजना 2014 मध्ये सुरू झाली. ती चालविण्यासाठी खासगी कंपन्यांशी सहा वर्षांचा करार करण्यात आला होता. काही कंपन्या करार संपल्यानंतर 2021 पासून पुढे आल्या नाहीत. ज्या कंपन्या केंद्रे चालविण्यासाठी पुढे येतील त्यांना आम्ही यंत्रसामुग्री देऊ.
-शिवनगौडा पाटील, उपसंचालक कृषी विभाग









