वार्ताहर/ निपाणी
शेतीच्या वादातून झालेल्या भ्याड हल्ल्यात मगदूम कुटुंबीयांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले होते. या कुटुंबीयांचा मानसिक आधारही खचला होता. लोकवर्गणी व जनतेचे पाठबळ यातून हे कुटुंब आता सावरत असतानाच उन्हाळय़ातील जनावरांच्या चाऱयाची सोय म्हणून साठवणूक केलेल्या त्यांच्या वीस हजार गवताच्या पेंडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला पण यातून एक पेंडीही गवत वाचू शकले नाही. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गालगत वाळवे मळय़ानजीक मगदूम कुटुंबीयांचे शेत शिवार आहे. याच ठिकाणी ते वास्तव्यास आहेत. शेती व्यवसाय करणाऱया मगदूम कुटुंबीयांचा पशूपालन व्यवसाय सुद्धा आहे. उन्हाळय़ातील चाऱयाची सोय म्हणून त्यांनी आपल्या शिवारातील गवत कापून बडमी रचल्या होत्या. या बडमींना रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागल्याचे मगदूम कुटुंबीयांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. पण आगीत एक पेंडी गवतही शिल्लक राहिले नाही.
या घटनेनंतर बोलताना दादासाहेब मगदूम, बाबासाहेब मगदूम या दोन्ही बंधूंनी ही घटना पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा संशय व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वीही अशीच घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते निकु पाटील यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मगदूम कुटुंबियांचे झालेले नुकसान पाहून शहरवासीयांतून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात झाली आहे.









