गल्ली, मोहल्ल्यांमध्ये भटक्या श्वानांचे जीवन उष्टय़ा अन्नावरच अवलंबून असते. लॉकडाउनमुळे त्यांच्यासमोरही संकट उभे ठाकले आहे. पण अनेक लोक या मुक्या प्राण्यांना मदत करत आहेत. असेच एक व्यक्ती आहेत, ज्यांचे वय 70 वर्षे आहे. ते स्वतःच्या भागातील भटक्या श्वानांसाठी देवदूतापेक्षा कमी नाहीत. मागील 20 वर्षांपासून स्वतःच्या कमाईतून ते असहाय्य श्वानांचे पोट भरत आहेत.
70 वर्षीय पिल्लई केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्हय़ातील कझाकुट्टम भागातील रहिवासी आहेत. तेथील श्वान पिल्लई यांना पाहताच त्यांच्याकडे धाव घेतात. जवळपास दोन दशकांपासून ते मुक्या प्राण्यांना भोजन पुरवत आहेत.
मला पूर्वीपासूनच प्राण्यांवर प्रेम राहिले आहे. मी एखाद्या भुकेल्या श्वानाला पाहतो, तेव्हा त्याला खाऊ घालतो. पृथ्वी केवळ माणसांची नसून प्राण्यांचीही आहे. माणसांनी त्यांच्यासोबत राहणे शिकून घ्यावे. मी नेहमी स्वतःचे पोट भरण्यापूर्वी या मुक्या प्राण्यांचे पोट भरण्याचा प्रयत्न करतो असे ते सांगतात.

ना घर, ना नोकरी
त्यांचे मन किती मोठे आहे याचा अंदाज तुम्ही पिल्लई यांच्याकडे स्वतःचे घर नाही आणि नोकरी देखील नाही यातून लावू शकता. तरीही ते मुक्या प्राण्यांना अन्न भरविणे विसरत नाहीत. ते या प्राण्यांवर स्वतःच्या पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम करतात. त्यांनी 10 वर्षांपर्यंत भारतीय सैन्यात काम केले, त्यांना स्वतःच नोकरी सोडली, त्यांना निवृत्तिवेतन मिळत नाही, याचे दुःख त्यांना नाही. मागील लॉकडाउनमध्ये त्यांची नोकरी गेली होती.
मित्राच्या दुकानात वास्तव्य
सध्या पिल्लई एका मित्राच्या दुकानात राहतात. माझा पूर्ण दिवस श्वानांच्या भोवतीच निघून जातो. या असहाय्य श्वानांना खाऊ घालून मला मोठा आनंद मिळतो. कधी कधी मी या त्यांच्यावर हजार रुपये देखील खर्च करतो. काही लोक मला असे करण्यापासून रोखतात, ओरडतात आणि श्वानांना पळवून लावतात. त्यांनी हे वर्तन बदलायला हवे असे पिल्लई सांगतात.









