ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने इंटरनेटवरुन भारताविरोधी चुकीचा संदेश प्रसारित करणाऱ्या 20 युट्यूब चॅनेल्ससह दोन वेबसाईटवर भारताने बंदी घातली आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘नया पाकिस्तान’ नावाचा एक गट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने युट्यूबवरुन भारतविरोधी माहिती प्रसारित करत आहे. काश्मीर, शेतकरी आंदोलन, अयोध्या प्रकरण यासारख्या गोष्टींबद्दल या चॅनेलवरुन खोटी माहिती दिली जात असल्याचं समोर आले आहे. बंदी घालण्यात आलेल्या 20 युट्यूब चॅनेल्सपैकी 15 चॅनेल्सची मालकी ‘नया पाकिस्तान’ गटाकडे आहे. तर इतर चॅनेल्समध्ये ‘द नेकेड ट्रूथ’, ‘48 न्यूज’ आणि ‘जुनैद हलीम ऑफिशियल’सारख्या चॅनेल्सचा समावेश आहे. सुधारित माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील बदलांनुसार हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी यूटय़ूब आणि टेलिकॉम विभागाला पाठवलेल्या पत्रामध्ये देशाच्या एकतेला आणि सर्वभौमत्वाला धोका पोहचवणारा कंटेंट आणि अशा माध्यमांना तातडीने ब्लॉक करण्यात यावं असे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.









