महिला गटातही सुवर्णपदकाची कमाई, ऍन्टोनेल्ला पॅल्मिसानोची अव्वल कामगिरी,
20 किलोमीटर्स रेस वॉकमध्ये पुरुषांच्या गटातील सुवर्णपदकानंतर इटलीच्या खात्यावर आता महिलांच्या गटातील सुवर्ण देखील नोंदवले गेले असून यामुळे एकाच इव्हेंटमधील दोन्ही सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम त्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शुक्रवारी महिला गटात ऍन्टोनेल्ला पॅल्मिसानोने सुवर्ण जिंकले, त्यावेळी इटलीच्या या पराक्रमावर शिक्कामोर्तब झाले. इटलीने महिला गटात या इव्हेंटचे सुवर्ण जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ऍन्टोनेल्लाने सुवर्ण जिंकताना विश्वविक्रमवीर यांग जियायू हिला देखील पिछाडीवर टाकले. चीनची यांग या इव्हेंटमधील काही टप्प्यात आघाडीवर होती. मात्र, नंतर ती यात सातत्य राखू शकली नाही. इटालियन ऍन्टोनेल्लाने 1 तास 29 मिनिटे 12 सेकंद वेळेत हा इव्हेंट पूर्ण करत सुवर्ण जिंकले. कोलंबियाची सांन्द्रा एरेनासने रौप्य तर चीनच्या लियू हाँगने कांस्यपदकाची कमाई केली.
या रेसच्या पहिल्या 3 क्वॉर्टर्समध्ये बऱयाच ऍथलिट्समध्ये चुरस होती. पण, नंतर 16 किलोमीटर्सचा टप्पा सर केला गेल्यानंतर ऍन्टोनेल्लाने लक्षवेधी आघाडी घेतली. 18 किलोमीटरनंतर तर तिने अजिबात मागे वळून पाहिले नाही. ब्राझीलची इरिका सेना अंतिम फेरीअखेर तिसऱया स्थानी होती. मात्र, फिनिश लाईनजवळच तिला तिसरी पेनल्टी सोसावी लागली आणि या पेनल्टीमुळे ती तिसऱया स्थानावरुन चक्क 11 व्या स्थानी फेकली गेली.









