श्रीनगर
लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दोन संशयित दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीमध्ये अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही दहशतवादी मुख्य दहशतवाद्यांच्या सहाय्यकांची भूमिका बजावत होते. भाजप नेत्यांच्या हत्येच्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी राज्यात व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे. यावेळी दोन स्थानिक संशयित जाळय़ात सापडले असून त्यांची चौकशी केली जात आहे. हल्ला करणाऱया दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या लपण्याची स्थाने पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे. त्याच शोध मोहीमेत हे दहशतवादी हाती लागले. त्यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांसंबंधी माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या हत्यांमुळे जम्मू भागात संतापाची लाट उसळली असून मारेकऱयांना लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी अनेक हिंदू संघटनांनी सरकारकडे केली आहे. शुक्रवारी विविध भागात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, या दोन संशयितांव्यतिरिक्त कोणतेही ठोस धागेदोरे सुरक्षा यंत्रणांना मिळालेले नाहीत.









