वृत्तसंस्था/ रॉसो, डॉमिनिका
फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने विंडीजच्या दोन्ही सलामीवीरांना लवकर बाद केल्याने बुधवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत उपाहारापर्यंत यजमान विंडीजला भारताच्या भेदक माऱ्यासमोर 4 बाद 68 धावांच जमविता आल्या. यावेळी पदार्पणवीर अॅलिक अॅथनेझ 13 धावांवर खेळत होता.
विदेशी वातावरणात पहिल्यांदाच तिसरा सीमर म्हणून गोलदांजी करणाऱ्या शार्दुल ठाकुरने मोक्याच्या वेळी बळी मिळविण्याची सवय येथेही कायम ठेवली तर अश्विनने पहिल्या सत्रात 25 धावांत 2 बळी मिळविले. जडेजाने एक बळी घेत त्याला चांगली साथ दिली. उपाहाराच्या ठोक्याला शेवटच्या चेंडूव्र जर्मेन ब्लॅकवूडचा मोहम्मद सिराजने अप्रतिम झेल टिपल्याने विंडीजला चौथा बळी गमवावा लागला. पहिल्या सत्रातील 28 षटकांत अतिसावध खेळणाऱ्या विंडीजला केवळ 6 चौकार नोंदवता आले.
नाणेफेक जिंकल्यानंतर विंडीजने प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीर तेजनरेन चंदरपॉल (44 चेंडूत 12) व कर्णधार क्रेग ब्रेथवेट (46 चेंडूत 20) यांनी सिराज व उनादकट यांच्या गोलंदाजीसमोर अतिसावध फलंदाजी केली. दोन्ही गोलंदाज वारंवार बाहेर जाणाऱ्या चेडूवर वारंवार चकत होते. या दोन्ही गोलंदाजांनी निर्माण केलेल्या दबावाचा फायदा अश्विनने उठवला. त्याने गोलंदाजीत हुशारीने बदल करून दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवले होते. वडील शिवनरेन चंदरपॉल यांच्याप्रमाणेच स्टान्स असणारा तेजनरेन जास्त साईड-ऑन स्टान्स घेतो. शफल करण्याची सवय हेरून अश्विनने त्याला एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केले.
ब्रेथवेटला थोडेस जलद चेंडू टाकून अश्विनने हैराण केले. केंडी फोडण्यासाठी त्याने एक मिडॉनच्या दिशेने स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला. पण कव्हरवर त्याचा उंच झेल उडाला आणि कर्णधार रोहित शर्माने तो आरामात झेलला. नंतर रेमन रीफरही फारवेळ टिकला नाही. शार्दुलने त्याला 2 धावांवर यष्टिरक्षक इशानकरवी झेलबाद केले तर ब्लॅकवूडला जडेजाने उपाहाराआधीच्या शेवटच्या चेंडूवर बाद करून विंडीजची अवस्था 4 बाद 68 अशी केली.
संक्षिप्त धावफलक (उपाहारापर्यंत) : विंडीज प.डाव 28 षटकांत 4 बाद 68 : ब्रेथवेट 46 चेंडूत 3 चौकारांसह 20, चंदरपॉल 44 चेंडूत 12, रीफर 2, ब्लॅकवूड 34 चेंडूत एक चौकारासह 14, अॅथनेझ खेळत आहे 2 चौकारांसह 13, अवांतर 7. गोलंदाजी : अश्विन 2-25, ठाकुर 1-7, जडेजा 1-6.









