प्रतिनिधी/ मडगाव
राज्यातील मासेमारीवरील बंदी 1 ऑगस्ट रोजी उठणार असली, तरी मागील दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने खवळलेला समुद्र जरा शांत झाला आहे. त्यामुळे कोलव्यातील काही मच्छीमारांनी होड्या समुद्रात उतरविल्या असता त्यांच्या जाळ्यांमध्ये उच्च प्रतीची सोलार कोळंबी सापडल्याने त्यांचा चेहऱ्यांवर उत्साह दिसून आला. एकंदरित सुमारे 2 टन सोलार कोळंबी शनिवारी कोलव्यात मासेमारी करून पकडण्यात आली.
सोलार ही उच्च प्रतीची कोळंबी म्हणून गणली जाते व त्याला बाजारात भावही चांगला असतो. मासेमारी मोसमाच्या सुरुवातीला जवळपास आठवडाभरच अशी ही सोलार कोळंबी मच्छीमारांना मिळत असते त्यामुळे मच्छीमार मासेमारी मोसम सुरू होण्याची वाट पाहत असतात. 1 ऑगस्टपासून मासेमारी मोसमाला प्रारंभ झाल्यानंतर मासेमारी करणारे ट्रॉलर या सोलार कोळंबीच्या अपेक्षेनेच समुद्रात उतरत असतात. सध्या जे लहान होड्या घेऊन कोलवा समुद्रात मासेमारी करण्यास गेले ते समुद्रात एकदम खोलवर जात नसतात आणि सुरक्षेचे भान ठेवूनच ते मासेमारी करत असतात.
शुक्रवारी सकाळी तीन होड्या घेऊन गेलेल्या मच्छीमारांनी दुपारी परत किनारा गाठला असता जाळ्यात सापडलेले पहिल्या मोसमाचे मत्स्यधन पाहून त्यांचे चेहरे उजळल्याचे दिसून आले. आपल्या दोन होड्यांना सुमारे दीड टन सोलार कोळंबी सापडल्याची माहिती मारियो फर्नांडिस यांनी दिली, तर अन्य एक होडीमालक फ्रँक यांनी चांगल्या प्रमाणात सोलार कोळंबीसह बांगडे, मोरी व अन्य मिश्र मासे जाळ्यात सापडल्याचे सांगितले. नव्या मासेमारी मोसमाची सुऊवात चांगली झाल्याने आम्ही देवाचे आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली