राग मनात धरून स्वप्निल याने अजितला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली
कवठेमहांकाळ : उसने दिलेले पैसे मागितले म्हणून अजित क्षीरसागर (३२, रा कुकटोळी) या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना कुकटोळी येथे घडली. खुनातील दोन्हीही संशयित आरोपींना अवघ्या चार तासात कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मयत अजित उर्फ संजय क्षीरसागर याने गावातीलच स्वप्निल तानाजी क्षीरसागर याला दोन हजार उसने दिले. हे पैसे मागण्यासाठी १८ रोजी रात्री साडेदहा वाजता अजितने स्वप्निल व सुशांत शंकर शेजुळ यांना मारुती आकाराम कारंडे हायस्कूल पाठीमागे बोलावले.
तिथे अजितने सुशांत शेजुळ यास उसने घेतलेले दोन हजार परत मागितले. त्याचा राग मनात धरून स्वप्निल याने अजितला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुशांतने दगड अजितच्या डोक्यात घातला. स्वप्निलने अजितच्या पायावर दगड मारुन त्याला गंभीर जखमी केले.
जीवे मारण्याची धमकीही दिली. जखमी अवस्थेत अजितला मिरजेच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले असताना त्याचा मृत्यू झाला. याची फिर्याद त्याची पत्नी सीमा क्षीरसागर यांनी दिली. अजितच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार संशयित स्वप्निल क्षीरसागर व सुशांत शेजुळ याना पोलिसांनी ताब्यात घेतले.








