वृत्तसंस्था / अनंतनाग
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्हय़ातील पॉशक्रीरीमध्ये मंगळवारी सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक झली आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. चकमक अद्याप सुरूच असून सुरक्षा दलांनी आणखी काही दहशतवाद्यांना घेरले आहे.
पोशक्रीरी भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली होती. शोधमोहिमेच्या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यावर सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.
ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून दानिश भट उर्फ कोकब दुरी अणि बशारत अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. 9 एप्रिल 2021 रोजी शासकीय कर्मचारी सलीम याची झालेली हत्या आणि 29 मे 2021 रोजी जबलीपोरामध्ये दोन नागरिकांच्या हत्येत हे दहशतवादी सामील होते. तर सोमवारी या दहशतवाद्यांनी अनंतनागमधील सुरक्षा दलांच्या एका केंद्रावर हल्ला केला होता. यापूर्वी शोपियां जिल्हय़ातील बसकुचन येथे दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती.









