महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ : 50 लाख कर्मचाऱ्यांना फायदा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात (डीए) 2 टक्के वाढ करण्यात आली आहे. शुक्रवार, 28 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी जुलै 2024 मध्ये सरकारने त्यात 3 टक्के वाढ केली होती. या वाढीमुळे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. याचा फायदा सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होईल. केंद्र सरकारच्या या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची गुढीपाडवा ‘गोड’ होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दर 6 महिन्यांनी वाढ होते. आता नव्याने जाहीर केलेली वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल. महागाई भत्त्याच्या घोषणेत विलंब झाला होता, त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पगारात गेल्या तीन महिन्यांच्या (जानेवारी ते मार्च 2025) थकबाकीसह वाढलेला महागाई भत्ता समाविष्ट असेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. सरकार सहसा होळी आणि दिवाळीसारख्या मोठ्या सणांपूर्वी महागाई भत्त्यात वाढ जाहीर करते. पण यावेळी होळीनंतर आणि गुढीपाडव्यापूर्वी त्याची घोषणा करण्यात आली.
मोदी सरकारने शुक्रवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ जाहीर केली. ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत करण्यात आली आहे. वाढत्या महागाईशी लढण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत करणे हा या निर्णयाचा उद्देश आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक दिलासा मिळेल. सरकारचे हे पाऊल कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक ठरेल, कारण त्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारेल, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.
पगार किती वाढेल?
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 50,000 रुपये असेल, तर 53 टक्के महागाई भत्त्याअंतर्गत त्याला 26,500 रुपये महागाई भत्ता मिळत असेल. पण आता 55 टक्के डीएनुसार, त्याला 27,500 रुपये मिळतील, म्हणजेच त्याच्या पगारात 1,000 रुपयांनी वाढ होईल. त्याचप्रमाणे, 70,000 च्या मूळ पगारावर तो आता 38,500 रुपयांपर्यंत वाढेल.
78 महिन्यांनंतर डीएमध्ये 2 टक्के वाढ
गेल्या काही वर्षांत, महागाई भत्ता दरवर्षी 3 ते 4 टक्क्यांनी वाढवला जात होता, परंतु 78 महिन्यांनंतर (सुमारे 6.6 वर्षे) पहिल्यांदाच महागाई भत्ता फक्त 2 टक्क्यांनी वाढवला गेला आहे. यापूर्वी 2018 मध्ये महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. सध्या झालेली दरवाढ ही गेल्या सात वर्षातील सर्वात कमी आहे.
महागाईचा सामना करण्यासाठी डीए
महागाई भत्ता म्हणजे महागाई वाढली तरी सरकारी कर्मचाऱ्यांचे राहणीमान राखण्यासाठी दिले जाणारे पैसे. हे पैसे सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिले जातात. देशाच्या सध्याच्या महागाईनुसार दर 6 महिन्यांनी त्याची गणना केली जाते. संबंधित वेतनश्रेणीवर आधारित कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार त्याची गणना केली जाते. शहरी, निमशहरी किंवा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वेगवेगळा असू शकतो.









