पुरवणी आरोपपत्रात दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने स्वत:च्या पुरवणी आरोपपत्रात मनीष सिसोदियांनी 2 मोबाइल नष्ट केल्याचा दावा केला आहे. हे पुरवणी आरोपपत्र राउज अॅव्हेन्यू न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने तुरुंग अधिकाऱ्यांना मनीष सिसोदियांना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी प्रॉडक्शन वॉरंट जारी केले आहे.
सिसोदियांसोबत सीए बुच्ची बाबू गोरंटला, मद्य व्यावसायिक अर्जुन पांडे आणि अमनदीप ढल यांना समन्स बजावण्यात आला आहे. या सर्व आरोपींना 2 जून रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले.
सिसोदियांनी दोन मोबाइल नष्ट केल्याची बाब मान्य केल्याचा दावा सीबीआयने पुरवणी आरोपपत्रात केला आहे. 1 जानेवारी 2020 पासून 19 ऑगस्ट 2022 पर्यंत सिसोदियांनी तीन मोबाइल हँडसेट्सचा वापर केला होता असे चौकशीत आढळून आले होते. दोन हँडसेट 22 जुलै 2022 पूर्वी वापरण्यात आले होते, ते नष्ट करण्यात आले आहेत.
या घोटाळ्याचे मूळ मानले जाणाऱ्या जीओएमच्या वादग्रस्त अहवालाची निर्मितीमागे सिसोदियांची मुख्य भूमिका आहे. वितरकांकडून लाभ मिळविण्याचा सिसोदियांचा प्लॅन होता असा दावा पुरवणी आरोपपत्रात करण्यात आला आहे. अबकारी धोरणात खासगी होलसेलरला 5-12 टक्क्यांचे प्रॉफिट मार्जिन देण्यात आले होते. जनतेचे मत मागविण्याच्या प्रक्रियेत फेरफार केले तसेच अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांकडून मनाजोगी ईमेल मिळविल्याचा आरोप सिसोदियांवर आहे. सीबीआयने नोंदविलेल्या गुन्ह्dयाप्रकरणी सिसोदियांनी 24 मे रोजी न्यायालयात दाखल केलेली स्वत:ची जामीन याचिका मागे घेतली होती.









