थायलंडमध्ये आठवडाभरात बिघडली स्थिती ः घरांमधून बाहेर न पडण्याचा सल्ला
@ वृत्तसंस्था / बँकॉक
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मागील एक आठवडय़ात 2 लाख लोक रुग्णालयात दाखल झाले आहेत. वायू प्रदूषणामुळे या लोकांना श्वसनावेळी त्रास सुरू झाला होता. या पर्यटनाच्या स्थळी राहणारे लोक उद्योग, वाहनांमधून निघणारा धूर आणि शेतांमध्ये जाळण्यात येणाऱया कृषी अवशेषांमुळे त्रस्त झाले आहेत.
वायू प्रदूषणामुळे तीन महिन्यांमध्ये 13 लाख लोक आजारी पडले आहेत. यातील 2 लाख लोक मागील एक आठवडय़ात रुग्णालयात दाखल झाले आहेत. याचदरम्यान आरोग्य मंत्रालयाने लोकांना एन-95 मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुलांना आणि महिलांना घरांमधून बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचल्याने बँकॉक प्राधिकरणाने जानेवारीपासूनच लोकांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला होता. प्रशासनाने आता वाहनांमधून निघणाऱया धूराची तपासणी करण्याचे कार्य हाती घेतले आहे. तर नर्सरी आणि शाळांमध्ये ’नो डस्ट रुम’ तयार करण्यात आले आहेत. तेथे एअर प्यूरीफायर बसविण्यात आले आहेत. सध्यातरी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु धोका टळलेला नाही. आगामी काळात लोकांना घरातच ठेवण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्याची वेळ येऊ शकते असे अधिकाऱयांनी म्हटले आहे.
बँकॉकच्या हवेत पीएम 2.5 पार्टिकलचे (प्रदूषणास कारणीभूत ठरणारे अत्यंत सुक्ष्म कण)चे प्रमाण अत्यंत अधिक आहे. हे कण रक्तात मिसळले जात असल्याने आजारांचा धोका वाढतो असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. हवेत फैलावलेले पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) मानवी फुफ्फुसांसाठी अत्यंत घातक आहेत. या कणांचा आकार 2.5 मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो. या कणांमुळे अकाली मृत्यू देखील ओढवू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार पीएम 2.5 हवेत 5 मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटरपेक्षा अधिक असू नये.









