संकेश्वरात भाविकांची गर्दी : पावसामुळे भाविकांचा हिरमोड
प्रतिनिधी /संकेश्वर
नवसाला पावणारा, अशी ख्याती असलेल्या निलगार गणपतीचे गणेश चतुर्थीपासून आतापर्यंत जवळपास 2 लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे. शनिवारी दुपारी व रविवारी सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी मोठी रांगच लागल्याचे दिसून आले. रविवारी पहाटे ते रात्री 11 वाजेपर्यंत सुमारे 1 लाख भाविकांनी दर्शन घेतले. मात्र, पावसाने हजेरी लावल्याने भाविकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
बेंगळूर, हुबळी, धारवाड, बेळगावसह गोवा, महाराष्ट्रातील कानाकोपऱयातून भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतले आहे. हेद्दुरशेट्टी यांच्या घरापासून अनेक व्यापाऱयांनी मिठाई, पेढे, स्टेशनरी, वडापाव, नारळ-कापूरची दुकाने थाटली आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिसांच्यावतीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेश चतुर्थी ते आजपर्यंत जवळपास कोटय़वधीची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱयांकडून मिळाली आहे.
19 सप्टेंबर रोजी राजा निलगारचे विसर्जन होणार आहे. 18 रोजी महाप्रसाद व भजनाचा कार्यक्रम होणार आहे. 19 रोजी सकाळी 11 वाजता महाआरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याची माहिती हेद्दुरशेट्टी परिवाराने दिली आहे.









