चर्चबाहेर घडला प्रकार
वृत्तसंस्था/ एमेस
बंदुकीचा वापर रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे विधान अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी केल्यावर काही तासातच गोळीबाराची आणखीन एक घटना घडली आहे. अमेरिकेच्या आयोवामध्ये एमेस शहरात एका चर्चबाहेर गुरुवारी रात्री गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला तसेच हल्लेखोरही मारला गेला आहे.
एमेस शहरातील ‘कॉर्नरस्टोन चर्च’बाहेर झालेल्या या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून यात हल्लेखोरही सामील असल्याची माहिती स्टोरी काउंटी शेरिफ ऑफिसकडून देण्यात आली. अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका शाळेत माथेफिरुने केलेल्या गोळीबारात 21 जणांना जीव गमवावा लागला होता. ओक्लाहोमाच्या टुलसामध्ये बुधवारी एका इसमाने रुग्णालयात गोळीबार केला होता. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी गुरुवारी देशाला संबोधित करताना बंदुकांवर नियंत्रणाच्या दिशेने प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन संसदेला केले होते. देशात होत असलेल्या गोळीबाराच्या घटना पाहता शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर मर्यादा आणण्याची गरज आहे, अखेर आम्ही किती नरसंहार पाहणार असे उद्गार बिडेन यांनी काढले होते.









