एनआयए न्यायालयाचा निर्णय : कानपूरमध्ये शिक्षकाच्या माथ्यावर टिळा पाहून घेतला होता जीव
वृत्तसंस्था /लखनौ
लखनौ येथील एनआयए न्यायालयाने इस्लामिक स्टेटशी निगडित दोन दहशतवाद्यांना मृत्युदंड ठोठावला आहे. एनआयए न्यायालयाने यापूर्वी 4 सप्टेंबर रोजी कानपूरमधील निवृत्त शिक्षक रमेश बाबू याच्या हत्येप्रकरणी दहशतवादी आतिफ आणि फैसल यांना दोषी ठरविले होते. गुरुवारी दोघांनाही व्हर्च्युअल स्वरुपात न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीश दिनेश चंद्र मिश्रा यांच्या न्यायालयाने दोन्ही गुन्हेगारांना प्रत्येकी 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दहशतवाद्यांनी निवृत्त शिक्षकाच्या हातातील धार्मिक चिन्ह अन् माथ्यावरील टिळा पाहून त्याची हत्या केली होती. 24 ऑक्टोबर 2016 रोजी शिक्षक रमेश यांची दोन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. शिक्षकाच्या हत्येच्या 7 महिन्यांपर्यंत पोलिसांना मारेकरी सापडले नव्हते. हत्येच्या 200 दिवसांनी एनआयएने मोठा खुलासा करत रमेश बाबू यांना ठार करणारे साधारण गुन्हेगार नसून इस्लामिक स्टेटचे दहशतवादी आतिफ मुजफ्फर आणि मोहम्मद फैसल हे असल्याचे म्हटले होते.
कानपूरमधील शिक्षकाच्या हत्येच्या घटनेच्या 5 महिन्यांनी मध्यप्रदेशात दहशतवादी हल्ला झाला होता. 7 मार्च 2017 रोजी भोपाळ-उज्जैन पॅसेंजर रेल्वेत बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 24 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. तपासादरम्यान हा दहशतवादी हल्ला असल्याचे समोर आले होते. यानंतर एनआयए आणि केंद्रीय यंत्रणा सक्रीय झाल्या होत्या. याचदरम्यान 7 मार्च रोजी एटीएसने गुप्तचर इनपूटनंतर दहशतवादी सैफुल्लाहला लखनौमध्ये ठार केले होते. या दहशतवाद्याच्या ठिकाणावरून मिळालेली शस्त्रास्त्रs तसेच कागदपत्रांद्वारे इस्लामिक स्टेटच्या एका मोठ्या नेटवर्कचा खुलासा झाला होता. यानंतर एटीएसने मोहम्मद फैजल, गौस मोहम्मद खान, अजहर, आतिफ मुजफ्फर, मोहम्मद दानिश, सैयद मीर, हुसैन आसिफ इक्बाल उर्फ रॉकी आणि मोहम्मद आतिफला अटक करण्यात आली होती. बिगरमुस्लिमांमध्ये दहशत निर्माण करून इस्लामिक स्टेटचा प्रभाव वाढविण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता. याकरता त्यांना शस्त्रास्त्रs पुरविण्यात आली होती.









