टॅटू काढून घेण्याचा छंद नवा नाही, परंतु काही लोकांकरता टॅटू काढून घेणे केवळ छंद राहत नाही. असाच एक टॅटूप्रेमी इसम कॅनडात असून त्याच्या शरीरावर इतके टॅटू आहेत की, ते पाहिल्यावर त्याचे शरीर आहे का एखादा नोटीस बोर्ड असा प्रश्न उभा ठाकू शकतो. या इसमाने टॅटूसाठी 2 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे.
कॅनडाच्या रेमीसाठी टॅटू काढून घेणे हा जणू आयुष्याचा ध्यास ठरला आहे. रेमीला जगातील सर्वाधिक टॅटू काढून घेणारा पिता म्हटले जाते. त्याने शरीरावर असंख्य टॅटू काढून घेतले असून यामुळे त्वचेवर 10-30 हून अधिक लेयर तयार झाले आहेत. इतके लेयर, तास आणि सेशन कुठल्याही माणसाने आतापर्यंत करविले नसल्याचा त्याचा दावा आहे. रेमीचा टॅटू काढून घेण्याचा प्रवास 2001 साली सुरू झाला होता, तेव्हा त्याने पहिले फेशियल पियर्सिंग करविले होते, यानंतर त्वरित त्याने स्वत:च्या मुलाचे नाव एका खास डिझाइनमध्ये टॅटूच्या स्वरुपात तयार करविले. तेव्हापासून त्याचे आयुष्य टॅटू आणि बॉडी आर्टच्या अवतीभवती घुटमळत आहे.
प्रथम एका रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम करणारा रेमी आता आठवड्यात अनेकदा टॅटू पार्लरमध्ये जातो आणि दरवर्षी स्वत:च्या शरीरावर नवी आर्ट जोडतो. आतापर्यंत त्याने बॉडी आर्टवर 2,15,000 युरो खर्च केले आहेत. रेमी सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 1.64 लाख फॉलोअर्स आहेत. तेथे तो स्वत:च्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करतो. याचबरोबर तो युट्यूबवरही सक्रीय आहे. रेमी आता स्वत:च्या टॅटूप्रेमामुळे जगभरात ओळखला जात आहे.









