मोरबी दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक सत्य समोर
मोरबी / वृत्तसंस्था
गुजरातमध्ये घडलेल्या मोरबी झुलता पूल दुर्घटनेसंदर्भात धक्कादायक सत्य समोर आले आहे. या पुलाचे व्यवस्थापन ज्या कंपनीवर सोपविले होते, त्या ओरेवा कंपनीला या कामासाठी राज्य सरकारकडून 2 कोटी रुपये देण्यात आले होते. तथापि, कंपनीने केवळ 12 लाख रुपयेच खर्च केले, असे उघड होत आहे.
गुजरात सरकारने या पुलाच्या दुरुस्तीसाठी योजना बनविली होती. त्यानुसार कंपनीला 2 कोटी रुपये देण्यात आले. तथापि, कंपनीने महत्वाची दुरुस्ती केलीच नाही. केवळ वरवरचे दिखाऊ काम करुन पूल लोकांसाठी सुरक्षित असल्याचा आभास निर्माण केला. 2 कोटींपैकी उरलेल्या 1 कोटी 88 लाख रुपयांचे काय झाले, याची आता चौकशी केली जात असून या रकमेचा कंपनीकडून अपहार झालेला आहे, हे उघड आहे. परिणामी सखोल चौकशीची मागणी होत आहे.
पुलाच्या दुरुस्तीसाठी कंपनीने नेमका किती खर्च केला, याची कागदपत्रे उपकंत्राटदार देवप्रकाश सोल्युशन्स या कंपनीकडून जप्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रांमधून हा धक्कादायक खुलासा होत आहे. ओरेवा कंपनीला मार्च 2022 पासून 15 वर्षांपर्यंत या पुलाच्या व्यवस्थापनाचे कंत्राट मिळाले होते. या कंपनीने देवप्रकास सोल्युशन्स या कंपनीला या कामाचे उपकंत्राट दिले. या उपकंत्राटदार कंपनीने पुलाची दुरुस्ती करुन घेतली. दुरुस्तीचे काम कसे झाले आहे, याची पाहणी करण्यासाठी ओरेवा कंपनीचे मालक आणि त्यांचे कुटुंब स्वतः गेले होते. या कुटुंबातील सदस्यांनी पुलावरुन काही पावले चालून तो लोकांसाठी खुला कारण्याची सूचना केली होती. ज्या उपकंत्राटी कंपनीला व्यवस्थापनाचे काम सोपविले होते, तिचा या कामातील अनुभव अपुरा होता. तांत्रिकदृष्टय़ाही ही उपकंत्राटी कंपनी सक्षम नव्हती, असे दिसून येत आहे.
या पुलाच्या चार केबल्स पूर्ण गंजलेल्या होत्या. दुरुस्ती करताना या केबल्स बनलण्याचे काम सोडाच, पण त्यांचे ऑयलिंग आणि ग्रिसिंगही करण्यात आले नव्हते. पुलाच्या लाकडी फळय़ा काढून ऍल्युमिनियमच्या चार पदरी लाद्या बसविल्या गेल्या होत्या. त्यामुळे पुलाचे वजन वाढले. या वाढीव वजनाचा ताण केबल्सना असहय़ झाला आणि मोठय़ा संख्येने लोक ये जा करीत असताना पूल कोसळला, असे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.









