मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर
दुशेरे : कराड तालुक्यातील कृष्णा काठावरील शेरे गावातील शेकडो वर्षापूर्वीचा गावाचा मुख्य रस्ता अखेर काँक्रिटीकरणासह नव्याने खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तब्बल दोन कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन दोन किलोमीटर लांबीचा हा रस्ता दर्जेदार स्वरूपात पूर्ण करण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यामुळे न्याय मिळाला असून आता या रस्त्यावरून नियमित वाहतूकही सुरू झाली आहे. परिणामी, गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, शेरे गावाच्या वेशीपासून ते शेरेपाटी राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचा हा ऐतिहासिक मार्ग आजवर अत्यंत खराब स्थितीत होता.
अरुंद आणि खडबडीत अवस्थेमुळे या रस्त्यावरून शेतीमाल वाहतूक, उसाची बाहतूक तसेच शेतीसाठी लागणारे मशागती साहित्य ने-आण करताना शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. विद्यार्थ्यांसह नागरिकांना कराडकडे जाण्यासाठी हाच रस्ता जवळचा आणि सोयीचा होता. मात्र रस्त्याची अवस्था खराब झाल्याने अनेकदा प्रवास टाळला जात असे. हा रस्ता सुस्थितीत यावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती.
अखेर या समस्येवर कायमचा तोडगा निघत मुख्यमंत्री सडक योजनेमुळे शेरे गावाला मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेतून नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर दोन ठिकाणी मजबूत मोऱ्यांचे बांधकामही करण्यात आले आहे, जेणेकरून पावसाळ्यातही बाहतूक सुरळीत राहील.
संपूर्ण रस्ता काँक्रीट पद्धतीने करण्यात आला असून, त्याचा दर्जाही उत्तम असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
पूर्वी शेरे स्टेशन ते गावच्या बेशीपर्यंतचा पर्यायी रस्ता वापरला जात होता. मात्र तोही धोकादायक झाला होता. त्यामुळे शेकडो वर्षांपूर्वी गावाला जोडणारा मूळ रस्ताच सुरक्षित आणि नव्याने पुनरुज्जीवित होण्याची गरज होती. ती आता पूर्ण झालेली आहे. या रस्त्यामुळे येथील दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे.








