कोल्हापूर : संतोष पाटील
राज्यातील 210 साखर कारखान्यांपैकी सोलापुरातील सुरू असलेल्या एका कारखान्याचाही 16 एप्रिलरोजी अखेरचा भोंगा वाजला. परिणामी राज्यातील गळीत हंगामाची अधिकृत सांगता झाली. 1054 लाख टन उसाचे गाळप होवून 105 लाख टन साखरेचं उत्पादन झाले. मागील वर्षीची तुलना करता तब्बल 22 लाख टन साखरेचं उत्पादन कमी झाले. तर सरासरी महिन्याच्या कमी अंतराने गळीत हंगामाची सांगता झाली. 11.45 टक्के इतक्या मोठ्या उताऱ्याने 27 लाख टन साखर उत्पादन करत कोल्हापूर-सांगली जिह्याने मागील वर्षीप्रमाणेच अव्वल स्थान राखले. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.98 टक्के आहे.
एक टक्का साखरेचा उतारा कमी पडणे म्हणजे दहा किलो साखर उत्पादन घटण्यासारखे आहे. एक टक्का साखर उतारा कमी पडल्यास साखरेच्या दराप्रमाणे प्रतिटन 310 रुपयांचा तोटा होतो. मागील दहा वर्षात राज्यात सरासरी अकरा टक्के आणि त्याहून अधिक साखर उतारा मिळाला आहे. यंदा प्रथमच बारा वर्षात अकरा टक्क्यांपेक्षा खाली उतारा आला आहे. मागील वर्षी सरासरी 11.30 टक्के उतारा होता. 2011-12 साली राज्यात उसाखाली 7.56 लाख हेक्टर क्षेत्र होते. 2020-2021 मध्ये 11.42 लाख हेक्टर क्षेत्र होते. तुलनेत गात हंगामाच्या तुलनेत 3.20 लाख हेक्टर उसाखालील क्षेत्र वाढले. यंदाच्या वर्षी 1054.75 लाख टन उसाचे गाळप झाले. त्यातून 105 लाख 27 हजार टन साखरेचं उत्पादन झाले. गत हंगामात 197 साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी महाराष्ट्रात विक्रमी 137.28 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. राज्यात यंदा 210 साखर कारखान्यांकडून 122 ते 125 लाख टन साखर उत्पादीत होईल असा अंदाज होता. मात्र 105 लाख टन इतकीच साखर उत्पादीत झाली. दरम्यान राज्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीच्या 17 हजार कोटी रुपयांपैकी 88 टक्के रक्कम अदा केली आहे.
राज्यातील अंतर्गत साखरेची गरज 75 लाख टन तर निर्यात 20 लाख टन झाली आहे. मागील वर्षीची शिल्लक 40 लाख टन होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी जादाच्या शिल्लक साखरेचं ओझ कारखान्यांवर राहणार नाही.
सलग पावसाचा आणि हवामान बदलाचा मोठा परिणाम ऊस उत्पादनावार झाला. सप्टेंबर महिन्यात उसाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे उन्ह मिळालेच नाही. मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असला तरी तो सगलपणे पडला नाही. परिणामी उसाची वाढच झाली नाही. यंदाच्या वर्षी राज्यात किमान 138 लाख टन साखरेचं उत्पादन होईल असा अंदाज चुकला आणि 18 टक्के साखरेचं उत्पादन कमी झाले. – विजय औताडे ( साखर उद्योगाचे अभ्यासक)
विभाग कारखाने गाळप (लाख टन) साखर उत्पादन (लाख टन) उतारा टक्के
कोल्हापूर 36 231.92 26.54 11.45
पुणे 32 226.2 22.90 10.13
सोलापूर 50 231.78 20.78 8.96
अहमदनगर 28 136.25 13.16 9.66
छत्रपती संभाजी नगर 26 109.57 10.12 9.24
नांदेड 30 106.58 10.68 10.2
अमरावती 04 7.80 0.75 9.63
नागपूर 04 4.83 0.34 7.20
एकूण 210 1054.75 105.27 9.98
गाळप हंगामाची वैशिष्ट
ऊस गाळप 1054 लाख टन
साखर उत्पादन 105.2 लाख टन
साखर उतारा 9.98 टक्के
सरासरी गाळप दिवस 115








