पायाभूत विकासाकरिता मोठी गुंतवणूक- प्रतिदिन 40 किमी लांबीचा महामार्ग तयार होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकार आगामी काळात पायाभूत क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. पायाभूत विकासाला सरकार सर्वोच्च प्राथमिकता देत आहे. सरकारने पुढील 2 वर्षांमध्ये 15 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य निश्चित केल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी यांनी शनिवारी दिली आहे.
रस्ते वाहतूक परिवहन मंत्रालय चालू आर्थिक वर्षात प्रतिदिन 40 किलोमीटर लांबीच्या महामार्ग निर्मितीचे लक्ष्य गाठणार आहे. सरकारने रस्ते क्षेत्रात 100 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) मंजुरी दिली आहे. भारतात 2019-2025 पर्यंत नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन यासारखे प्रकल्प पहिल्यांदाच सुरू करण्यात आले आहेत. सरकार देशाच्या नागरिकांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देणे आणि जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे उद्गार गडकरी यांनी काढले आहेत.
7300 प्रकल्प सुरू होणार
एनआयपी अंतर्गत 2025 पर्यंत सुमारे 7300 प्रकल्प सुरू केले जातील. या प्रकल्पांचा खर्च 111 लाख कोटी रुपये असणार आहे. एनआयपीचा उद्देश प्रकल्पाच्या तयारीत सुधारणा घडवून आणणे आणि पायाभूत क्षेत्रासाठी गुंतवणूक आकर्षित करणे असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.
अमेरिकेच्या कंपन्यांना आमंत्रण
गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडो-युएस पार्टनरशिप व्हिजन परिषदेला संबोधित पेले आहे. द्विपक्षीय संबंधांच्या नव्या युगात दोन्ही देशांचे राष्ट्रीय हितसंबंध जुळून येत आहेत. व्यापारासह अनेक मुद्दय़ांवर दोन्ही देशांमधील विश्वास वाढत आहे. लवकरच दोन्ही देशांदरम्यान अनेक मोठे व्यापारी करार होतील. अमेरिकेच्या कंपन्यांना भारतातील पायाभूत आणि एमएसएमई क्षेत्रात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करत असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.









