सकारात्मक चाचण्यांनंतर ‘भारत बायोटेक’चा दावा : मुलांच्या लसीकरण प्रक्रियेला वेग येणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोव्हॅक्सिन ही लस लहान मुलांसाठी सुरक्षित असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. दोन ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवरील कोव्हॅक्सिनच्या दुसऱया आणि तिसऱया चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. ही लस घेतल्यामुळे मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचे तपासणीत दिसून आले असून ही लस मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे ‘भारत बायोटेक’ने गुरुवारी स्पष्ट केले. देशात सध्या कोरोनाबरोबरच ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असतानाच कंपनीने जाहीर केलेल्या या निरीक्षणांमुळे देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘डीजीसीआय’ने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर याबाबत सातत्याने चर्चा होत असतानाच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशात केवळ 18 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांनाच कोरोनाची लस दिली जात आहे. कोव्हॅक्सिन ही आता भारतातील मुलांसाठी वापरण्यासाठी मंजूर झालेली दुसरी लस आहे. देशात वाढणाऱया कोरोनाच्या नव्या धोक्मयाच्या पार्श्वभूमीवर 15-18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
‘डीजीसीआय’च्या मंजुरीमुळे कोव्हॅक्सिनचा वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या आणि दुसऱया डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असेल. सरकारला सादर केलेल्या चाचणी डेटानुसार, प्रौढ आणि मुलांसाठी लसीचे अंतर आणि डोस समान असेल. विषय तज्ञ समितीने ऑक्टोबरमध्ये या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी शिफारस केली होती.
देशात दुसऱया लाटेत अनेक लहान मुलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच दक्षिण आफ्रिकेमध्ये उदयास आलेल्या ओमिक्रॉन हा व्हेरियंट लहान मुलांमध्ये अधिक वेगाने संक्रमित होत असल्याचे काही निष्कर्षांमध्ये समोर आले होते. त्यामुळे भारत बायटेकने संकटात सकारात्मक बातमी दिली आहे. भारत सरकारने लसीकरणाला मान्यता दिल्यानंतर आता लवकरच दोन वर्षांवरील मुलांचेही लसीकरण सुरु होईल. यामुळे भारतातील लसीकरणाला आणखी वेग मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवडय़ातच मुलांचे लसीकरण सुरू करत असल्याची घोषणा केली. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण होणार असून नजिकच्या काळात ही वयोगटमर्यादा आणखी शिथील केली जाऊ शकते. मुलांच्या लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत देशातील सुमारे 90 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोरोनाचा पहिला डोस मिळाला आहे. तसेच आता नव्या वर्षाच्या प्रारंभापासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रीकॉशनरी डोस घ्यावा लागेल. सदर लाभार्थींना सरकार एसएमएस पाठवणार असून ही प्रक्रिया 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे.









