वृत्तसंस्था/ हैदराबाद
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आता कोरोना बाधितांवरील उपचारात वापरले जाणारे औषध डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) निर्मितीचे तंत्रज्ञान भारतीय औषध कंपन्यांना हस्तांतरित करण्याच्या तयारीत आहे. डीआरडीओने याकरता 17 जूनपर्यंत ईमेलद्वारे अर्ज मागविले आहेत. 2-डीजी हे औषध डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहकार्याने इन्स्टीटय़ूट ऑफ न्युक्लियर मेडिसीन अँड अलाइड सायन्सेस या डीआरडीओच्या प्रयोगशाळेने विकसित केले होते.
हे औषध रुग्णालयात दाखल रुग्णांना जलद बरे करण्यास मदत करते आणि ऑक्सिजनवरील निर्भरता कमी करत असल्याचे वैद्यकीय परीक्षणाच्या निष्कर्षांमधून समोर आले होते. हे औषध संक्रमित पेशींची ओळख पटवून त्यांची ग्लुकोज घेण्याची क्षमता रोखते. अशा स्थितीत विषाणूंची संख्या वाढत नाही आणि रुग्ण जलद बरा होतो.
15 कंपन्यांना त्यांच्या क्षमतेच्या आधारावर 2-डीजी औषधाचे तंत्रज्ञान देण्यात येणार आहे. कंपन्यांकडून सादर दस्तऐवजांची छाननी तांत्रिक मूल्यांकन समितीकडून (टीएसी) केली जाणार असल्याचे डीआरडीओने सांगितले आहे.
संबंधित कंपन्यांकडे ड्रग लायसेंसिंग अथॉरिटीजकडून ऍक्टिव फार्मास्युटिकल इंग्रीडिएंट (एपीआय) निर्मितीसाठी औषध परवाना आणि डब्ल्यूएचओ जीएमी (गूड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस) सर्टिफिकेशन असणे आवश्यक आहे. डीआरडीओकडून विकसित 2-डीजी औषध कोरोनावरील उपचारात अत्यंत उपयुक्त ठरेल आणि या महामारीच्या विरोधी युद्धात अत्यंत निर्णायक ठरू शकते असे सरकारचे म्हणणे आहे. या औषधाचा वापर कर्करोगाच्या रुग्णांवरल उपचारासाठीही होतो. देशाच्या अनेक सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये ऑगस्टपर्यंत या औषधाच्या तिसऱया टप्प्यातील वैद्यकीय परीक्षण सुरू राहणार आहे. यात 220 रुग्ण सामील होतील.









